गुहागर, ता. 19 : सुगंधा सोनू वने (एसएसडब्ल्यू) फाउंडेशनच्या वतीने महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, पाचेरी आगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत एकूण १४१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली कलात्मक प्रतिभा सादर केली. स्पर्धेतील विजेत्यांना फाउंडेशनचे अध्यक्ष दालचंद वने, दीपाली वने, रामचंद्र हुमणे गुरुजी, पांडुरंग पाते, निलेश सुर्वे तसेच रवींद्र आंबेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. Painting competition by SSW Foundation
स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली होती. इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी ‘माझी शाळा’ किंवा ‘जलसंवर्धन काळाची गरज’ हे विषय देण्यात आले होते, तर इयत्ता आठवी ते दहावी गटासाठी ‘सौर ऊर्जा काळाची गरज’ किंवा ‘वारकरी दिंडी’ हे विषय देण्यात आले होते. पाचेरी आगर, पाचेरी सडा, आवरे, असोरे, शिवणे, कोळवली, कुडली, आबलोली आणि तवसाळ येथील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याची सुविधा तसेच चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य फाउंडेशनतर्फे उपलब्ध करून देण्यात आले होते. Painting competition by SSW Foundation
सुगंधा सोनू वने फाउंडेशनचे अध्यक्ष दालचंद वने यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्षे मुंबई शहरात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, त्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा विकास करणे आणि उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणे या उद्देशाने फाउंडेशन महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाला सातत्याने सहकार्य करत आहे. Painting competition by SSW Foundation
स्पर्धेतील विजेत्यांमध्ये इयत्ता पाचवीत श्रेया शिवाजी साळवे, समीक्षा शिवाजी साळवे व स्वराली सुभाष जोशी, इयत्ता सहावीत आरोही रवींद्र ठोंबरे, रूनय रंजीत मालप व प्रीत अनिल जोशी, इयत्ता सातवीत शुभ्रा निलेश सुर्वे, मीरा मदन मोरे व श्रद्धा गणेश हुमणे, इयत्ता आठवीत रितेश रमेश शितप, आसावरी अंकुश हुमणे व श्रावणी राजेश वने, इयत्ता नववीत पियुष प्रदीप शितप, साहिल संजय भुवड व सौरभ संदेश भरणकर, तर इयत्ता दहावीत वैष्णवी दिनेश शितप, हर्षाली दत्ताराम काताळकर व आर्यन नंदू शितप यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. Painting competition by SSW Foundation

कार्यक्रमास महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, सरचिटणीस पांडुरंग पाते, गुहागर तालुका पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, फाउंडेशनचे अध्यक्ष दालचंद वने, दीपाली वने, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, आंबेरेचे माजी सरपंच रवींद्र अवेरे, विनायक सुर्वे, वासुदेव पांचाळ, श्रीकांत पांचाळ, मुख्याध्यापक पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. Painting competition by SSW Foundation
स्पर्धेचे परीक्षक म्हणून साळुंखे सर, सौदागर सर, अंबुलगेकर सर आणि साळवे सर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाष्टे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुगंधा सोनू वने फाउंडेशनच्या टीमने तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. Painting competition by SSW Foundation
गुहागर तालुका पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. उपसभापती या नात्याने नव्हे, तर एका विद्यार्थिनीचे पालक म्हणून ते सकाळी ९.३० वाजल्यापासून कार्यक्रम समाप्त होईपर्यंत उपस्थित होते. त्यांच्या या सहभागाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या कन्या शुभ्रा सुर्वे हिने इयत्ता सातवी गटात प्रथम क्रमांक पटकावला असून ती नवोदय विद्यालय, राजापूर येथील विद्यार्थिनी आहे. Painting competition by SSW Foundation
