गुहागर, ता. 16 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर एकेकाळी गुहागरमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांना आगामी काळात सद्या डोके वर काढणारा शिंदे गट व त्याला भाजपची साथ मिळाल्यास त्यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुहागरमध्ये आम. जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सक्रीय आहेच. त्यातून मनसेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात आ. भास्कर जाधव यांना अनेक बाजुंनी घेरण्याची त्यांचे विरोधक संधी सोडणार नाहीत. गुहागरातील हे राजकीय चक्रव्यूह आ. जाधव कसे भेदतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. Opposition’s strategy on MLA Jadhav
गुहागरमध्ये चिपळूण शिवसेनेतून आलेल्या आ. भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गुहागर विधानसभा मतदार संघात गावागावात व वाडीवस्तीवर मोठ्या प्रमाणावर विकास कामे केल्यामुळे व कामे करण्याच्या त्यांच्या अवाक्यामुळे जवळपास संपूर्ण तालुका त्यांच्या पाठीशी उभा राहिला. सर्व समाजाचे प्रमुख नेते त्यांचे कार्यकर्ते बनले. सरपंच, पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य अशा सर्व स्तरावर त्यांनी आपली एक हाती सत्ता स्थापन केली. आ. भास्कर जाधव यांनी मागील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूक्यातील अनेक जण राष्ट्रवादीतच राहिले. व त्यांच्या शिवाय शिवसेनेने या लढाईत भास्कर जाधव यांना विजयी केले. Opposition’s strategy on MLA Jadhav
आपल्या विकास कामांच्या जोरावर व लोकांच्या समस्येवर कायमच उपाय करणारा नेता म्हणून या मतदार संघात भास्कर जाधव यांचेकडे पाहिले जाते. मात्र, सद्या राज्य स्तरावर बदलेल्या राजकीय समिकरणांची नांदी गुहागरमध्ये ऐकावयास मिळू लागली आहे. आ. भास्कर जाधव यांचे राजकीय विरोधक शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपशी हातमिळवणी करून आ. जाधव यांच्यावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे पुढे आले आहे. त्यातच मनसेहि आपली भूमिका स्पष्ट केली नसली, तरी आ. जाधव यांचे विरोधक आगामी काळात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्याच्या काळात तरी आ. जाधव यांच्या समोर आव्हान उभे करणारा एकही नेता कुठल्याच पक्षात नाही, हेच सत्य आहे. यापूर्वीही या सारख्या राजकीय संकटांना धाडसीपणाने सामोरे जाणाऱ्या आ. भास्कर जाधव गुहागरात त्यांच्या समोर उभा राहीलेला हा राजकीय चक्रव्यूह कसा भेदतात हे पाहाणे आगामी काळात औत्सुक्याचे ठरणार आहे. Opposition’s strategy on MLA Jadhav