GUHAGAR NEWS : कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर ऑलीव्ह रिडले (Olive Ridley) कासव संरक्षण आणि संवर्धनाचा विचार गेल्या 20 वर्षात रुजला. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे येतात कुठून, त्याचा अधिवास कुठे असतो. अंडी घालुन समुद्रात गेलेली कासवे काय करतात याचा अभ्यास सुरु झाला. वन विभाग, कांदळवन प्रतिष्ठान (Mangroove Foundation) आणि भारतीय वन्य जीव संस्था (WII) यांच्याद्वारे वेळास, आंजर्ले, गुहागर येथे अंडी घालण्यासाठी आलेल्या 5 कासवांना सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आले. या प्रयोगातून अनेक उत्साहवर्धक, उत्सुकता वाढविणारे निष्कर्ष समोर आले. त्यांचा घेतलेला आढावा. Olive Ridley turtle tagging report
मयूरेश पाटणकर, गुहागर
ऑलिव्ह रिडले जीवन चक्र
कासव संवर्धन क्षेत्रातून समुद्रात सोडलेली पिल्ले 13-14 वर्षांची होईपर्यंत समुद्रात नेमकी कुठे असतात हे कळु शकलेले नाही. साधारणपणे 16 वर्षांनंतर मादी कासव अंडी देण्यास सक्षम होते. 15 वर्षांनंतरची ऑलिव्ह रिडले कासवे ही त्यांना भरपुर प्रमाणात खाद्य उपलब्ध असते अशा क्षेत्रात असतात. मादी कासवे विणीच्या हंगामात पुन्हा समुद्रकिनाऱ्यांवर येतात. नर कासव कधीही समुद्रकिनाऱ्यावर आढळल्याचा पुरावा अजुनही सापडलेला नाही. Olive Ridley turtle tagging report
सामुदायीक व स्वतंत्र घरटी
भारतामध्ये 20 अंश उत्तर या अक्षवृत्तावर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यात तसेच पूर्व किनारपट्टीवर याच प्रजातीची कासवे तामिळनाडू व आंध्रप्रदेश या राज्यांच्या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले (Olive Ridley) मादी स्वतंत्रपणे घरटी घालण्यासाठी येते. याला शास्त्रज्ञांच्या भाषेत सॉलीटरी नेस्टींग असे म्हटले जाते. Olive Ridley turtle tagging report
उडिसा (Odisha) राज्यातील गहिरमाता ऋषीकुल्य या दोन समुद्रकिनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले मादी कासवे एकाचवेळी लाखांच्या घरात समुद्रकिनारी येवून जागा मिळेल तीथे अंडी घालतात. साधारणपणे ही कासवे तीन दिवस या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. याला अरिबाडा नेस्टींग (Arribada Nesting) म्हटले जाते. सध्या हे तीन दिवस नेमके कोणते आहेत. त्या कालावधीतल हवामान, समुद्रातील प्रवाह, तापमान यांची स्थिती कशी असते, चंद्राच्या स्थिती कोणती असते, त्याचे निरीक्षण संशोधक करत आहेत. पश्चिम बंगालचा समुद्रकिनाऱा मातीच्या चिखलयुक्त असल्याने तेथे ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालत नाहीत. Olive Ridley turtle tagging report
Conclusions of Satellite tagging
2022 मध्ये वेळास (1 प्रथमा), आंजर्ले (1 सावनी) आणि गुहागर (3 रेवा, लक्ष्मी, वनश्री) (The names given by research Team to Olive Ridley Female) अशा पाच कासवांना 2023 मध्ये गुहागरमध्ये गुहा आणि बागेश्री या दोन कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर (Satellite Transmitter) बसविण्यात आला होता. याच्या निरिक्षणातून खालील निष्कर्ष समोर आले
- अंडी घालण्यासाठी येणारी कासवे साधारणपणे समुद्राला नदी मिळते (खाडी मुख) त्या परिसरात सर्वाधिक काळ असतात. खाडीमुखाच्या क्षेत्रात त्यांना आवश्यक असणारे खाद्य मोठ्या प्रमाणात असते.
- प्रथमा व सावनी कासव पुन्हा एकदा अंडी घालण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर आले होते. याचा अर्थ एक मादी कासव विणीच्या एका हंगामात दोन ते तीन वेळा अंडी घालु शकतात.
- अंडी घालण्यापूर्वी व घालुन झाल्यानंतरचे 10 ते 20 दिवस मादी कासव किनाऱ्यालगत असते. अंडी घालुन गेलेली मादी पुढील 20 ते 40 दिवस त्याच समुद्र परिसरात घुटमळत असतात. या काळात ही कासवे समुद्रकिनाऱ्यापासून 20 ते 30 कि.मी. खोल समुद्रातही जातात.
- साधारणपणे एप्रिल अखेर पर्यंत पश्चिम किनारपटटीवरील (Indian West cost) समुद्रावरुन वहाणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह दक्षिणेकडून उत्तरेकडे असतो. त्याच्या मदतीने ही कासवे गुजरातच्या दिशेने प्रवास करत होती. पावसाळ्यापूर्वी वाऱ्याची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे बदलते त्या काळात ( मे महिन्यात) या कासवांचा प्रवास पुन्हा दक्षिणेकडे सुरु झाला.
याच काळात पुर्व किनारपट्टीलवर समुद्रातील वाऱ्याचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे सुरु झाल्यावर उडिशा व आंध्रप्रदेश परिसरातील ऑलिव्ह रिडले कासवेही दक्षिणेकडे म्हणजे तामिळनाडूकडे प्रवास करु लागतात.
माणसाप्रमाणेच कासवांचे स्वभावही बदलते
प्रथमा आणि वनश्रीचा स्वभाव पाण्याच्या पृष्ठभागालगत विहार करण्याचा होता. सावनी एकदाच खोल पाण्यात डुबकी मारुन परत पृष्ठभागावर आली. रेवा आणि बागेश्री अनेक वेळा 300 मिटरपर्यंत खोल पाण्यात जात होत्या. गुहाला मात्र खोल पाण्यात जाण्याची आवड असावी. याच कालावधीत सर्वाधिक वेळा गुहा 300 मिटरपेक्षाही खोल पाण्यात गेल्याचे निदर्शनास आले. काही कासवे अंडी देवून झाल्यावर पश्चिम किनारपट्टीवरील कारवार (कर्नाटक) परिसरात पावसाळा संपेपर्यंत थांबत असावीत तर काही कासवे बागेश्रीप्रमाणे वाऱ्याची अनुकुलता मिळाली तर कुठेही न घुटमळता थेट श्रीलंकेला प्रदक्षिणा घालुन तामीळनाडूच्या समुद्र क्षेत्रात येत असावीत. Olive Ridley turtle tagging report
गुहाने केला विक्रम
सॅटेलाईन ट्रान्समिटर टॅगिंगमुळे कासवे कुठे आहेत, त्याचा प्रवास कसा सुरु आहे हे आपल्याला कळत होते. त्याचबरोबर कासवे समुद्राच्या पाण्यात किती खोलवर जातात याची अचूक नोंदही ट्रान्समिटरद्वारे कळत होती. टॅगिंग केलेल्या 5 कासवांपैकी गुहा या कासवाने सर्वाधिक खोलीपर्यंत जाऊन भारतात विक्रम केला आहे. गुहा जवळपास 400 ते 450 मिटर खोल पाण्यात गेली. आजपर्यंत भारताच्या समुद्रकिनारपट्टीवर येणाऱ्या कोणत्याही कासवाने इतकी खोल डुबकी मारली नव्हती. Olive Ridley turtle tagging report
अपविलींग झोन
समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशामधील समुद्राचे कोमट पाणी खोल समुद्रात जाते आणि समुद्रावरुन वहाणाऱ्या वाऱ्यांमुळे खोल समुद्रातील पाणी किनाऱ्याकडे येते. या पाण्याबरोबर समुद्रातील पोषक अन्न द्रव्येही किनाऱ्याकडे येतात. ही प्रक्रिया जगातील काही किनाऱ्यालगत विशिष्ट कालावधीत सुरु असते. त्यामुळे अपविलींग झोनमध्ये मोठ्या प्रमाणात समुद्री जीवांना खाद्य उपलब्ध होते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मार्च ते मे आणि पूर्व किनारपट्टीवर जुन ते सप्टेंबर या कालावधीत अपविलींग झोन तयार होतात. Olive Ridley turtle tagging report
यु आणि व्ही प्रकारची डुबकी
नाकाने श्र्वासोत्सव करणाऱ्या कासवांमध्ये बराच काळ श्र्वास रोखून ठेवण्याची क्षमता असते. विश्रांतीसाठी किंवा खाद्य शोधण्यासाठी श्र्वास रोखून कासवे खोल पाण्यात डुबकी घेतात. ट्रान्समिटरने दिलेल्या संदेशांद्वारे हे सिध्द झाले आहे. ही डुबकी घेतल्यावर काही काळ कासवे पाण्याखालुन प्रवास करतात त्याला यु प्रकारची डुबकी म्हणतात. एखाद्यावेळी पाण्याखाली अन्न दिसले तर वेगाने त्या अन्नावर झडप घालून पुन्हा पाण्याच्या पृष्ठभागावर येणे याला व्ही प्रकारची डुबकी म्हणतात.
स्वत:च्या चुंबकीय बलाचा प्रभावी वापर
ब्राझीलमधील शास्त्रज्ञांनी तेथील किनाऱ्यावर येणाऱ्या अंडी देण्यासाठी आलेल्या 20 कासवांना 100-150 कि.मी खोल समुद्रात नेवून त्यांच्या अवतीभवती चुंबकीय बल तयार केले. सुरवातील चंबुकीय बलाने कासवे सैरभैर झाली. मात्र भानावर आल्यावर या कासवांनी स्व:तचे चुंबकीय बल (जीओ मॅग्नेटीक फिल्ड) शोधले आणि ति पुन्हा आपल्या ठिकाणी पोचली. Olive Ridley turtle tagging report
22 वर्षांपूर्वी सुरु केलेल्या मोहिमेमुळे कोकण कासव संवर्धनाबाबत जागरुक झाले. आता या मोहिमेचा पुढचा संशोधनाचा टप्पा सुरु झाला आहे. त्यातून अनेक गोष्टी पुराव्यानीशी सिध्द होत आहेत. याचा फायदा सागरी कासवांच्या संरक्षणाबरोबरच देशालाही होणार आहे. एका अर्थाने आम्ही सुरु केलेली मोहिम यशस्वी होत आहे याचे समाधान वाटते.
– भाऊ काटदरे, कासव संवर्धन चळवळीचे प्रेणेते
जमीनीवरील प्राणी, पक्षी यांचे निरिक्षण करणे सोपे होते मात्र विशाल समुद्रातील कासवांच्या जीवनाविषयी काहीच माहिती नव्हते. या संशोधनामुळे त्यांचा जीवनक्रम, प्रवास, त्यामागची कारणे समजली. हे सर्व उत्साहवर्धक होते. कांदळवन प्रतिष्ठानने या संशोधनासाठी पुढाकार घेतला म्हणून हे शक्य झाले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
– राजश्री कीर, विभागीय वनाधिकारी, चिपळूण
अनेकवेळा पर्यटकांना शास्त्राधार नसलेल्या गोष्टी मनोरंजनासाठी सांगाव्या लागतात. कासव संशोधनामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना संशोधनातून सिध्द झालेले ज्ञान मिळणार आहे. त्यातून पर्यटकांना निसर्गाविषयी ओढ निर्माण होईल. विज्ञाननिष्ठ, पर्यावरणपूरक पर्यटनाची संकल्पनेवर इथले पर्यटन वाढविण्याची मोठी संधी यानिमित्ताने आपल्याला मिळाली आहे.
– समीर काळे, पर्यटन व्यावसायिक
निसर्ग आपल्याला किती भरभरुन देतो हे कासव संवर्धन संशोधनातून समोर आले आहे. भारतीय वन्य जीव संस्था असे संशोधन वेगवेगळ्या प्राण्यांवर करते. इंटरनेटद्वारे त्याची माहिती घेतली तर आपण अधिक निसर्गाच्या प्रेमात पडू. हे प्रेमात पडणच निसर्गाच्या संवर्धनाची जाणिव आपल्यात निर्माण करेल.
– नीलेश बापट, निसर्गसेवक संस्था, चिपळूण
संशोधनातून पाण्यात काय करते हे आपल्याला समजले. आम्ही तर रोजच किनाऱ्यावरील कासवांचे जीवन पहातो. गेल्या तीन वर्षात त्यांच्यात आणि आमच्यात एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे. सुरक्षित जागी निवांतपणे अंडी देणारे कासव, धोक्याची जाणिव झाल्यावर अंडी वाचविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे काढणारे कासव, अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्यापूर्वी होणारी हालचाल या सर्व गोष्टी समजतात. त्यातही खूप आनंद मिळतो. –
संजय भोसले, कासव मित्र