नीलेश राणे, शृंगारतळीतील मैदान गर्दीने भरले
गुहागर, ता. 16 : नातू कुटुंबाने 40 वर्षात गुहागर मतदारसंघाचे (Guhagar) नाव एका उंचीवर नेऊन ठेवले होते. मात्र आमदार जाधव यांनी 15 वर्षात नाव घालवले. गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर, पर्यटन स्थळी यांच्या एजंटनी इतक्या जमीनींची खरेदी केली आहे की ही किनारपट्टी देखील तुमची राहीलेली नाही. अशा आमदाराला 2024 मध्ये गुहागरच्या मतदारांनी घरी पाठवावे. असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी शृंगारतळी येथे जाहीर सभेत केले. (Nilesh Rane in Guhagar)
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे वेळी आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबियांवर अश्लाघ्य शब्दांत टिका केली होती. त्याच्या टिकेला उत्तर देण्यासाठी नीलेश राणेंची जाहीर सभा भाजपाने गुहागरमध्ये आयोजित केली होती. तत्पूर्वी चिपळूणमध्ये आमदार भास्कर जाधव समर्थक आणि नीलेश राणे समर्थक यांच्यात शाब्दीक संघर्ष आणि त्यानंतर दगडफेक झाली. पोलीसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवावे लागले. त्याचा पडसाद गुहागरातील सभेत उमटणार हे निश्चित होते. (Nilesh Rane in Guhagar)
माजी खासदार नीलेश राणेंनी दिला इशारा
माजी खासदार नीलेश राणेंनी सभेची सुरवातच आमदार भास्कर जाधव यांचा एकेरी उल्लेख करुन आणि अत्यंत खालच्या पातळीवरील टिकेने केली. तु आमच्या शेपटीवर पाय दिलास, आता मी तुला सोडणार नाही. नीलेश राणे याच जन्मात हा हिशोब चुकता करणार. मी नीलेश नारायणराव राणे अशीच ओळख सांगतो. मी वडिलांसाठी जगतो. मला निवडणुकीची पर्वा नाही. भर चौकात नको नको ते शब्द तुम्ही वापरले. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या प्रत्येक टिकेला नीलेश राणे उत्तर देणार. राज्यात कुठेही जाऊन भास्कर जाधव यांनी टिका केली तर तिथे जावून सभा घेणार. आज दगडफेक झाली, आम्हाला नखं लावलेस आता सोडणार नाही. मेरा वक्त बदला है हैसियत नाही और तेरी किस्मत बदली है औकात नही असा इशाराच यावेळी राणेंनी दिला. (Nilesh Rane in Guhagar)
यावेळी नीलेश राणेंनी भर सभेत आमदार जाधव यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करणारा तसेच एका कार्यक्रमात गाण्याच्या तालावर नाचणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांचा व्हिडिओ दाखवला. त्यानंतर राणे म्हणाले की, मला उबाठाच्या गटाच्या कार्यकर्त्यांना पण सांगायचे आहे, नको तेवढ्या शिव्या यांनी उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला घातल्या आहेत. रश्मी वहिनींना शिव्या घातल्यात, आज हेच आमदार जाधव रश्मी वहिनींना पक्षाचे नेतृत्त्व करण्यास बोलावत आहेत. खरचं यांचे कोणावर प्रेम आहे याचा विचार करा. रत्नागिरी जिल्ह्यात राजकारण करणाऱ्यांना विचारा यांचे आमदार शेखर निकम, मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते रामदास कदम, माजी आमदार रमेश कदम, खासदार सुनील तटकरे यांच्याजवळ पटले नाही. प्रत्येकाजवळ यांचे भांडण. प्रत्येकाला एकमेकाशी भांडणासाठी प्रवृत्त करायचे. तो माणूस इर्षेने पेटला पाहिजे, अंगावर आला पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण करायची. हा त्यांचा स्वभाव आहे. (Nilesh Rane in Guhagar)
Nilesh Rane in Guhagar
नीलेश राणे पुढे म्हणाले की, स्व. तात्या नातू आणि डॉ. विनय नातूंनी 40 वर्षात गुहागर मतदारसंघाला एका उंचीवर नेऊन ठेवले. अशा मतदारसंघाचे नाव 15 वर्षात आमदार बनुन भास्कर जाधव यांनी घालवले. डॉ. नातूंच्या घरात एकही ठेकेदार नाही. याउलट येथील विकासकामे आमदार जाधव यांचेच 5 ठेकेदार घेतात. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर व्यवसाय करुन रोजीरोटी कमावणाऱ्या स्टॉलधारकांचे स्टॉल तोडले गेले. त्यावेळी आमदार जाधव गप्प बसले होते. मात्र वेळणेश्र्वरातील आमदारांचा सीआरझेड मधील बंगला सुरक्षित आहे. या बंगल्याकडे जाणारा रस्ता चकाचक बनवला आहे. मात्र गुहागर तालुक्यातील ग्रामीण रस्ते कच्चे, गुहागर विजापूर महामार्गाचे काम अर्धवट आहे. ठेकेदारीत आमदार 5 टक्के घेतात. अशा माणसाला 2024 च्या निवडणुकीत जागा दाखविण्यासाठी तुम्ही तयार रहा. त्यासाठी नीलेश राणे कोणत्याही प्रकारची मदत करायला कायम तयार आहे. (Nilesh Rane in Guhagar)
या सभेला उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार विनय नातू, प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रशांत शिरगांवकर, संध्या तेरसे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश महामंत्री मुश्ताक दळवी, सिंधुदूर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, सावंतवाडी नगराध्यक्ष संजय परब, भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, खेड तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे, चिपळूण तालुकाध्यक्ष बंडु थरवळ, जिल्ह्यातील पदाधिकारी, यांच्यासह महायुतीतील शिवसेनेचे मुन्ना देसाई, गुहागर तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, राष्ट्रवादीचे साहिल आरेकर, अनघटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. (Nilesh Rane in Guhagar)
मी माफी मागतो
नातु साहेब आपल्यासमोर हे बोलावं लागलं याची खंत सुध्दा आहे. आज या व्यासपीठावर मला ही भाषा वापरावी लागली. त्याबद्दल मी आपली आणि स्व. तात्यांची माफी मागतो. असे वक्तव्य करुन भाषणाच्या शेवटी नीलेश राणे यांनी हात जोडून माफी मागितली.
मैदान भरले
माजी खासदार नीलेश राणे यांच्या सभेसाठी गुहागर भाजपने विशेष नियोजन केले होते. त्यामुळे सभा सुरु होण्यापूर्वीच पाटपन्हाळे हायस्कुलसमोरील संपूर्ण मैदान भरुन गेले होते. गुहागर विधानसभा क्षेत्रासह रत्नागिरी जिल्ह्यातूनही अनेक राणे समर्थक या सभेसाठी आले होते.
कार्यकर्त्यांसाठी नीलेश राणे उभे राहीले
नीलेश राणेंचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर व्यासपीठासमोरील सुरक्षा क्षेत्रात अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यासर्वांना सुरक्षा क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी पोलीस पुढे आले. त्यावेळी राणेंचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यातील संवाद नीलेश राणेंनी ऐकला आणि क्षणात ते व्यासपीठावरुन पुढे आले. पोलीसांना हे माझे कार्यकर्ते आहेत. त्यांना तीथेच उभे राहू द्या अशी सूचना केली. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून समर्थन केले.