पालशेत शौचालय दुरुस्तीचे काम ; ठेकेदाराची बनवेगिरी उघड
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक शाळांच्या शौचालय दुरुस्ती कामांच्या फलकावरील काम पूर्ण झाल्याच्या तारखा बदलण्याची बनवेगिरी कामांचे ठेकेदार यांनी केल्याचे ग्रा. पं. सदस्य मिनार पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, बुडत्याचा पाय खोलात असतो हे ना ठेकेदारांच्या लक्षात आले ना त्यांना याकामी साथ देणाऱ्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. सद्या गावात ठेकेदाराच्या पराक्रमाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. Negligence of contractor in development works
१५ वा वित्त आयोग ग्रा.पं.स्तरातून पालशेत गावातील बारभाई शाळा शौचालय दुरुस्तीचे काम ०५ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरू झाले. या कामासाठी रू. १ लाख १७ हजार १३९/- इतकी अंदाजपत्रकिय रकमेची तरतूद होती. आणि हे काम ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण झाल्याचे आधीच्या फलकावर नमूद करण्यात आले होते. मात्र, शौचालय घोटाळ्याबाबत बातमी दैनिक सागर मध्ये प्रसिद्ध झाली आणि फळाकावरील काम पूर्ण झाल्याची तारिख अचानक बदलली. आता त्या फलकावर ०८ नोव्हेंबर ऐवजी ११ डिसेंबर २०२२ अशी तारीख दिसत आहे. असाच तारीख बदल कालेवाठर शाळा शौचालय दुरुस्ती कामाच्या फलकावरही करण्यात आला असून १ लाख ५२ हजार १९३ रु. अंदाजपत्रकिय आर्थिक तरतूद असलेल्या या शौचालय दुरुस्तीचे काम दि. ०५ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरू झाले आणि १० नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण झाल्याचे या कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर नमूद करण्यात आले होते. मात्र या फलकावरीलही काम पूर्ण झाल्याची तारीख अचानक बदलली आणि आता ती ११ डिसेंबर २०२२ अशी टाकण्यात आली आहे. Negligence of contractor in development works
या शौचालय दुरुस्ती कामामध्ये अनेक बाबतीत घोटाळा असून काम पूर्ण होण्याआधीच अंतिम मूल्यांकन केले गेले. मग अगदी अंधारातून मोबाईलच्या मिणमिणत्या प्रकाशामध्ये काम उरकाण्याचा केविलवाणा प्रयत्न ठेकेदाराने केला होता. शौचालय दुरुस्ती कामामध्ये अनेक आक्षेपार्ह बाबी दिसून आल्या आहेत. त्याबाबतचे निवेदनही मिनार पाटील व ग्रामस्थांनी यांनी गटविकास अधिकारी यांना दिले. पण याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर बहुधा ठेकेदार आणि त्यांच्या स्थानिक साथीदारांची धावपळ सुरु झाली. आणि त्यातूनच त्यांनी हा काम पूर्ण झाल्याची तारीख बदलण्याचा उद्योग केल्याचे स्पष्ट होत आहे. आज गावात अशा ठेकेदारांना ग्रामपंचायत आणि पंचायत समिती अधिकारी पाठीशी घालत असून सोयीस्कर डोळेझाक करत असल्याचा आरोप मिनार पाटील यांनी केला आहे. ही अक्षरशः जनतेच्या पैशांची लूट असून याबाबत संबंधित विभागाने तातडीने दाखल घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी नरेंद्र नार्वेकर यांनी केली आहे. Negligence of contractor in development works

