जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी होणार मोर्चे बांधणी
गुहागर, ता. 23 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, खासदार सुनील तटकरे हे शुक्रवारी (दि. 24) गुहागर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये तालुक्यातील विकासकामांच्या आढाव्याबरोबरच आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचाही विचार केला जाणार आहे.
Senior NCP leader, MP Sunil Tatkare will be in Guhagar on Friday (Sept. 24). In his presence a meeting of the Nationalist Congress Party has been organized. Apart from reviewing the development, strategy for upcoming Panchayat Samiti and Zilla Parishad elections in Guhagar Taluka will also be decided in this meeting.
रत्नागिरी- रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे हे आज (शुक्रवार, ता. 24) गुहागरच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी दुपारी 3 वाजता पाटपन्हाळे (ता. गुहागर) येथील श्रीपूजा मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गुहागर तालुक्याची आढावा बैठक होणार आहे. ही बैठक खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थित होईल. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण विधानसभा आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, खेड-दापोली-मंडणगड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम, माजी आमदार रमेश कदम उपस्थित रहाणार आहेत. तरी तालुका आढावा बैठकीला पक्षाचे पदाधिकारी, सर्व सेलचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुका कार्यकारणी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी केले आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुहागरमध्ये पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या संपर्कात राहून तालुक्यातील अनेक विकासकामांना (रस्ते, साकव आदी) निधी मंजूर करुन आणला. तालुका आणि गुहागर शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबीर, अन्नदान, वृक्षारोपण, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, किनारे स्वच्छता मोहिम असे उपक्रम राबविले. यातून पक्षाचा जनसंपर्क कायम ठेवला.
तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी राजकारणात नवीन असतानाही पंचायत समिती गणनिहाय कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे, बैठका घेणे, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना नैतिक बळ देणे पक्षवाढीकडे लक्ष दिले आहे. या पार्श्र्वभुमीवर गुहागरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खासदार सुनील तटकरेंच्या दौऱ्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.
त्याचप्रमाणे गुहागर नगरपंचायतीमध्ये अस्तित्वात असलेल्या शहर विकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते पुन्हा पक्षात सक्रीय होण्यासंदर्भात खासदार सुनिल तटकरे कोणती भूमिका बजावणार. याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.