धीरज वाटेकर, चिपळूण, मो. ९८६०३६०९४८
याहीवर्षी स्वर्गसुंदर ‘कोकण’ काळवंडायला लागलंय. गेल्यावर्षी (२०२२) महाराष्ट्रात २४ हजार ५९२ ठिकाणी वणवे लागले होते. पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्प यामुळे होणारी वृक्षतोड थांबायचे नाव घेत नाही. तर जंगलांना लागणाऱ्या वार्षिक आगींमुळे वनक्षेत्रही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. अशा स्थितीत आपल्या सर्वांचा ‘गॉडफादर’ सह्याद्री आणि तिथली वनराई कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नसताना आपल्याला बरंच काही देते आहे. या वनराईला उन्हाळ्याच्या हंगामात काळवंडलेली पाहाणं दुर्दैवी असतं. आपल्याकडे देशभरातील जंगलांना लागणाऱ्या आगींवर नियंत्रण आणि उपाययोजना करण्यासाठी डेहरादूनहून नियंत्रित होणारे सॅटेलाईट तसेच फायर ब्लोअर आणि ड्रोनने पाण्याची फवारणी करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तरीही राज्यात पावसाळा सुरु होईपर्यंत पदोपदी वणवे पेटत राहातात. अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे यंदा (२१ फेब्रुवारी) कोकणातील रत्नागिरी नजीकच्या हातखंबा तारवेवाडी भागातील काजूच्या बागेला लागलेला वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यालाच आगीत होरपळून आपला प्राण गमवावा लागले. स्वर्गीयसौंदर्य अनुभवणाऱ्या नजरांना काळवंडलेलं ‘कोकण’ पाहाताना ‘ही मानवनिर्मित वणवा प्रवृत्ती जळणार तरी कधी?’ हा प्रश्न वर्षानुवर्षे छळतो आहे. Nature’s beauty is fading; Dheeraj Watekar


महाराष्ट्रातील जंगले ही कोरडी पानझडी जंगले (dry deciduous forests) आहेत. जानेवारीपासून आपल्याकडे पानगळतीला सुरवात होते. ही पानगळती आणि वाढलेले गवत वनवणव्यांना पोषक ठरते. वणव्यांचा कालावधी नोव्हेंबर ते मे असला तरी शिमग्यात हे प्रकार अधिक वाढतात. संस्कृती म्हणून शिमगोत्सव आम्हाला कितीही प्रिय असला तरी होळीसाठी झाडं तोडणं पटणारं नाही. आपण बदलत्या काळात प्रतिक म्हणूनही कचऱ्याची होळी करायला हवी. आपण आपल्या घराला, इमारतीला, कंपनीला आग लागली तर किंचाळतो, विव्हळतो, हतबल होतो. मग माळरानावर, डोंगरात वणवा पेटतो तेव्हा तिथल्या सजीवांनी कसा आक्रोश करायचा? त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत का पोहोचत नसावा? वणवा लावणारी प्रवृत्ती परदेशातून येत नाही. ती आपल्यातच आहे. जंगल माफियांसह गुरांसाठी अधिक चाऱ्याची उगवण व्हावी, काटेकुटे जळून जावेत, शेतीत राख येऊन उपन्नवाढ व्हावी, ससे पकडण्यासाठी, शिकारीस मदत, सागवान तस्करी, नाईट स्टे, जमीन जाळण्याची पद्धत, कोळसा बनवणाऱ्या टोळ्या, शेतातील कचरा आणि पालापाचोळा साफ व्हावा. अशा एक ना अनेक गैरसमजूती या प्रवृतीमागे असाव्यात. यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच पण कार्बन डायऑक्साईड वातावरणात वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढते आहे. सततच्या वणव्यांना कंटाळून शेतकऱ्यांनी जमिनी विकाव्यात, शेती-बागायती बंद करावी, तो देशोधडीला लागावा, त्याने पाळीव जनावरे विकावीत, जमिनी नापिक व्हाव्यात, जेणेकरून जमिनी कमी भावात बळकावता येतील असंही षड्यंत्र यामागे असू शकतं. आपल्या समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रात अनास्था आहे असं म्हटलं जातं. ही अनास्था काही प्रमाणात असते काही प्रमाणात नसते. ही अनास्था कमी करण्यासाठी आपण सातत्याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत राहाण्याची आवश्यकता आहे. आजचा काळ हा प्रत्यक्ष बघण्याचा आणि अनुभवण्याचा असूनही वणव्यासारख्या प्रवृत्ती फोफावत आहेत. या बदललेल्या समाजजीवनाचा विचार करायला हवा आहे. आपल्या समाजातील ही वणवा प्रवृत्ती नष्ट व्हावी. यासाठी सतत प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. चिपळूणला नुकताच ‘लोककला महोत्सव’ झाला. लोकांनी याला उदंड प्रतिसाद दिला. आपल्याच नाही तर देशभरातील संपूर्ण लोककला या शेतकरी जीवनाशी जोडलेल्या आहेत. त्या कमी झाल्या कारण शेती करणारी मंडळी आपल्याकडे कमी होत गेलीत. वणव्याचे चक्र असेच सुरु राहिले तर भविष्यात त्याचे असेही दुष्परिणाम आपल्या समाजाला भोगावे लागणार आहेत. Nature’s beauty is fading; Dheeraj Watekar
यंदाच्या मोसमात रायगडच्या उरण तालुक्यातील ऐतिहासिक द्रोणागिरी डोंगराला आठ दिवसात दोनदा आग लागली. या डोंगराच्या पायथ्याशी ओ.एन.जी.सी.चा देशातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. १० जानेवारीला आंजर्ले परिसरात वणवा लागून ३० बागा खाक झाल्या. १७ जानेवारीला खेडच्या मोरवंडे-बोरज भागात वणवा लागला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राजापूर तालुक्यातील सागवे-गोठीवरे परीसरात सकाळी लागलेल्या आणि ५ किमी पसरलेल्या वणव्यात जवळपास ३५ शेतकऱ्यांच्या बागा जळाल्या. २० फेब्रुवारीला अंबरनाथ, बदलापूर (टाहुली डोंगर) आणि वांगणी, पालघरच्या सापणे-वरले भागात वणवे पेटले. पोलादपूर जवळच्या चरई महादेवाच्या डोंगराला आग लागून मोठी हानी झाली. अलिबाग समुद्रकिनारी सुरूच्या बनाला, मंडणगड जवळच्या वेळास जंगलाला, माणगाव तालुक्यातील वडघर डोंगरावर आग लागून जंगल संपत्तीचं नुकसान झालं. यंदा सिंहगड, कात्रज भागात वणवा लागला. कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील वनौषधी पार्क, कोरीवडे, पेरणोली, हरपवडे भागातील दोनशे एकर जंगलाला वणवा लागला होता. नाशिक जिल्ह्यातील मातोरी गावाच्या गायखोऱ्यात ९ फेब्रुवारीला दुपारी वणवा लागल्याने शेकडो एकर जंगलक्षेत्र जळून खाक झाले. हा वणवा गाव शिवाराकडून लागला होता. वृक्षवल्ली फाउंडेशन, वृक्षमित्र परिवार आदींनी चार तासांच्या अथक प्रयत्नांनी वणवा विझवला. त्यामुळे अधिकच्या वनक्षेत्रात वणवा पसरला नाही. अहमदनगरच्या चांदबीबी महाल येथे (१४ फेब्रुवारी) वणवा पेटलेला असताना तरुणांनी तो विझवला. म्हसवे (२३ फेब्रुवारी) गावपठारावरील जंगलात वणवा लागला होता. ही माहिती मिळताच वर्ल्ड फॉर नेचर आणि दुर्ग शिलेदारांनी घटनास्थळी पोहोचून तो आटोक्यात आणला. Nature’s beauty is fading; Dheeraj Watekar
यातले काही वणवे नैसर्गिक असतात. १९७१ पासून सातत्याने उष्ण लहरींचे प्रमाण वाढत असून शीत लहरींचे प्रमाण कमी होत आहे. निसर्गातील हा असमतोल जंगलातील अपवादात्मक नैसर्गिक वणव्यांना निमित्त ठरतो आहे. बाकी मानवनिर्मित वणवे विझवायचे सरकारी आणि स्वयंसेवी प्रयत्न सुरु असतात. मीडियात ते जागाही मिळवतात. पण वणवा हा विषय इतका मोठा आहे की अख्खं गाव जरी विझवायला गेलं वणवा विझत नाही. कोणा एकाच्या विकृत डोक्यातील ही आग क्षणभरात असंख्य वन्यजीवांना सैरावैरा धावायला भाग पाडते. अभ्यासकांच्या मते २००३ पासून आपल्या देशात जंगलातील वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. वणव्याच्या प्रकोपातून होणारी पक्षी, त्यांची घरटी, सरपटणारे प्राणी, जैवविविधता यांची जीवितहानी हा मोठा चिंतेचा विषय आहे. डोंगरात वाढलेल्या गवताला विशेष किंमत मिळत नसल्याने वणवा लागू नये म्हणूनची गवतकाढणी शेतकऱ्यांना परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे. तरीही डोंगराळ भागातील गवत काढणी आणि येणारा वाहतूक खर्च विचारात घेऊन या गवतापासून कागद, पुठ्ठा, प्लायवूड आदी बनवणे शक्य आहे का? यावर अधिकचे संशोधन व्हायला हवे आहे. गवताची अधिकाची उत्पादकता सिद्ध झाल्यास ‘वणवा’ प्रवृत्ती कमी होऊ शकेल. डोंगराला लागणारा वणवा आपले अमर्याद नुकसान करू नये म्हणून गवताचा पाच सहा फूट रुंदीचा पट्टा आपल्याच देखरेखीखाली जाळण्याची पद्धत आहे. कोवळ्या झाडांना झळ पोहोचू नये म्हणून पावसाळ्यानंतर वाढलेले रस्त्याकडले गवत आपल्याकडे काढले जात नाही. म्हणून किमान आपण आपल्या खाजगी बागांमध्ये वाढलेले गवत काढणे जरुरीचे आहे. जंगल भागात वन खात्याने गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे. गस्ती दरम्यान विनाकारण जंगलात फिरणाऱ्या लोकांची झडती घ्यायला हवी आहे. जंगलात लाकूडफाटा आणण्यासाठी जाणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी आहे. जंगलातील अडचणीच्या जागा मोकळ्या करण्यासाठी वणवे लावले जातात. वणवे थांबवण्यासाठी जंगलात जाण्या-येण्याच्या मार्गांवर वाटेवर असलेल्या शेवटच्या घरात राहणाऱ्या गावकऱ्यांनी रखवालदार व्हावे लागेल. ग्रामपंचायती आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीने अशा मार्गांवर शेवटच्या घरात जंगलात जाताना आणि जंगलातून बाहेर येताना नोंद करण्यासाठी नोंदवही ठेवावी. वहीतून जंगलात दर दिवशी कोण जाते? वणवा लागलेल्या काळात जंगलातून कोण परतले? याचा अंदाज अशा प्रयत्नातून बांधता येईल. Nature’s beauty is fading; Dheeraj Watekar
जंगलांना निसर्गाने पुर्न:निर्माणाची क्षमता दिल्याने ऋतुचक्र बदलल्यावर पुन्हा नव्याने जैवविविधता निर्माण होत राहाते हे खरे असले तरी सततच्या वणव्यांचा जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होतो का? वणव्यानंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या जंगलांचं जीवन पूर्वीसारखं होतं का? हेही तपासण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणीयदृष्ट्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल घडवून आपल्याला निसर्गासोबत चांगलं जगणं शिकावं लागेल. मध्यंतरी आम्ही चिपळूणकरांनी ‘एकच देऊ नारा संपवू वणवा सारा’ म्हणत अखंड कोकण वणवा मुक्त व्हावं म्हणून ‘वणवा मुक्त कोंकण’साठी प्रयत्न केले होते. आमच्या टीमला या काळात आलेले सर्वांगीण अनुभव वणवा लागणारच नाही यासाठी समाज म्हणून आपण सर्वांनी जागरूक राहाणे आवश्यक असेच होते. अर्थात वणवा लावणाऱ्या प्रवृत्तीला कायद्याद्वारे जबरी शिक्षा मिळाल्याच्या नोंदी समाजमनात कर्णोपकर्णी होईस्तोवर आणि तंत्रज्ञानाचा वापर करून यावर ठोस उपाययोजना सापडेपर्यंत किमान सह्याद्रीच्या कडेकपारीत, डोंगरातील चढ-उतारावरील वणवे बघत काळवंडलेलं ‘कोकण’ अनुभवणे संवेदनशील मनांसाठी दुर्दैवी आहे. Nature’s beauty is fading; Dheeraj Watekar
(धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील ‘पर्यटन-पर्यावरण’ विषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखन’ या विषयावरील आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते गेली २५ वर्षे ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.)