सोमैया विद्याविहारमध्ये ‘समकालीन साहित्य : नवे संदर्भ’ राष्ट्रीय बहुभाषिक संगोष्ठी संपन्न
मुंबई, ता. 25 : सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या के. जे. सोमैया स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचरच्या वतीने २४ व २५ जुलै २०२६ रोजी आयोजित ‘समकालीन साहित्य : नवे संदर्भ’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय बहुभाषिक संगोष्ठी उत्साहात पार पडली. देशभरातील नामवंत साहित्यिक, अनुवादक, समीक्षक, कवी व संशोधकांच्या सहभागामुळे या संगोष्ठीला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. National Multilingual Seminar
उद्घाटन सत्रात प्रख्यात लेखिका डॉ. सूर्यबाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी नवोदित लेखकांनी चिकित्सक टीका स्वीकारण्याची मानसिकता ठेवावी, अनुवाद हा भाषा, समाज आणि संस्कृती यांना जोडणारा प्रभावी दुवा असल्याचे सांगत साहित्यामधून विवेक, संवेदना आणि शांततेचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. National Multilingual Seminar

सोमैया विद्याविहार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अजय कपूर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. संगोष्ठीत समकालीन कथा, कादंबरी, कविता, अनुवाद आणि प्रकाशन संस्कृती या विषयांवर विविध सत्रांमध्ये अभ्यासपूर्ण चर्चा झाली. यावेळी डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘चिंबोरे युद्ध’ या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका व समीक्षक डॉ. कुसुमलता सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदी साहित्यातील व्यंगात्मक कादंबरीच्या परंपरेला समृद्ध करणारी ही वेगळ्या आशयाची कादंबरी असल्याचे त्यांनी नमूद केले. National Multilingual Seminar
संगोष्ठीत विविध अनुवादित पुस्तकांवर विशेष परिसंवादही आयोजित करण्यात आला. त्यामध्ये ‘चिंबोरे युद्ध’, ‘मुंबई… बंबई… बॉम्बे’, ‘एक रोटी तीन चूल्हे’, ‘व्हिलचेयरवर लोकशाही’ तसेच ‘माधव कौशिक यांच्या निवडक कविता’ या पुस्तकांच्या अनुवादांवर चिकित्सक चर्चा झाली. ‘मुंबई… बंबई… बॉम्बे’ या हिंदी अनुवादाचे अनुवादक भारत वेडे यांनी अनुवाद प्रक्रियेतील अनुभव मांडले. National Multilingual Seminar
प्रा. प्रतिभा सराफ यांच्या कथासंग्रहाच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशनही डॉ. सूर्यबाला यांच्या हस्ते करण्यात आले. लेखक डॉ. बाळासाहेब लबडे यांनी समकालीन साहित्य, सामाजिक वास्तव आणि भाषांतराच्या माध्यमातून साहित्य अधिक व्यापक वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेवर विचार मांडले. National Multilingual Seminar
अनुवाद आणि प्रकाशन संस्कृती या विशेष सत्रात प्रख्यात अनुवादक डॉ. गोरख थोरात यांनी अनुवादातील आव्हाने, संधी आणि बदलत्या प्रकाशन संस्कृतीवर मार्गदर्शन केले. या सत्रात मनोज पाठक (वर्णमुद्रा प्रकाशन) यांचीही उपस्थिती होती. National Multilingual Seminar

कार्यक्रमात डॉ. कुसुमलता सिंह, डॉ. बळीराम गायकवाड, नरेंद्र पुंडलिक, अरुण सिंह, प्रा. प्रतिभा सराफ, डॉ. हेमेंद्र चंडालिया, भारत वेडे, देवा झिंगाड, राजेश विक्रांत आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी संशोधनपर निबंधांचे सादरीकरण, साहित्यिक संवाद आणि मुक्त चर्चांमुळे संगोष्ठी अधिक अभ्यासपूर्ण ठरली.
समारोप सत्रात ज्येष्ठ कवी नरेंद्र पुंडलिक यांनी अनुवाद, साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करत अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘मुंबई… बंबई… बॉम्बे’ या हिंदी कवितासंग्रहाने महानगराच्या इतिहासाची आणि संवेदनांची वेगळी जाणीव करून दिल्याचे त्यांनी सांगितले. समारोपप्रसंगी आयोजकांनी सर्व साहित्यिक, संशोधक, अनुवादक, विद्यार्थी व उपस्थितांचे आभार मानले. समकालीन भारतीय साहित्य, अनुवाद आणि बहुभाषिक संवादाला नवी दिशा देणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. National Multilingual Seminar
