सुधाकर मास्कर, कोरोना संकटानंतर शासनाचे दुर्लक्ष
गुहागर, ता. 18 : मराठवाड्यातील तमाशा आणि लावणी ही लोककला जशी राजाश्रयामुळे राज्यात प्रसिध्द झाली. त्याचपध्दतीने बहुरंगी संपूर्ण महाराष्ट्रात लोकाश्रय लाभावा. या लोककलाकारांच्या मागण्यांना शासन दरबारी योग्य न्याय मिळावा. या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील नमन कलाकारांनी एकत्र येवून कोकण नमन लोककला मंचाची (Konkan Naman Folk Art Group) स्थापना केली आहे. अशी माहिती या संघटनेचे खजिनदार आणि गुहागर शाखेचे अध्यक्ष सुधाकर मास्कर सांगितले.
कोकण नमन लोककला मंचाच्या स्थापनेनंतर गुहागर शाखेचे अध्यक्ष आणि जिल्हा संघटनेचे खजिनदार सुधाकर मास्कर यांनी गुहागर न्यूज (Guhagar News) सोबत हितगुज केले. संस्थेच्या उद्देश्यांविषयी ते म्हणाले की, कोकणातील बहुरंगी नमन या लोककलेचे सादरीकरण शिमगोत्सवापासून सुरु होते. शिमग्यात गावोगावी नमन, गण गौळण, वग यांचे कार्यक्रम होतात. त्यानंतर कोकणात लग्नसराईत, गावातील सार्वजनिक कार्यक्रमातून, वाडीपूजेचे वेळी ही लोककला सादर केली जाते. त्यातून 25 ते 50 कलाकारांना मानधन स्वरुपात रोजगार मिळतो.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना आल्यामुळे, टाळेबंदीमुळे सर्व ठप्प झाले. लोककलाकारांचा रोजगार बुडाला. अशावेळी शासनाने राजाश्रय देवून लोककलावंताना आर्थिक साह्य करावे. ही यांची अपेक्षा होती. मात्र पदरी निराशा आली. त्यावेळी आपण संघटित नसल्यानेच उपेक्षा सहन करावी लागत आहे. याची चर्चा सुरु झाली. तेव्हापासून गेले 8 महिने मुंबई आणि कोकणातील लोककलावंत, हितचिंतक संघटनेच्या निर्मितीसाठी तयारी करत होते. सुरवातीला मंडळांच्या बैठका, मग मुंबई आणि गावकऱ्यांच्या बैठका, मग तालुकास्तरावर एकत्रीकरण अशा टप्प्यातून या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.
कोकण नमन लोककला मंचामध्ये गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील लोककलांमध्ये काम करणारे सर्व कलाकार सहभागी झाले आहेत. शासनाकडून होणारी उपेक्षा थांबविण्यासाठी संघटित होणे आवश्यक होते. सध्या ही लोककला केवळ कोकणापुरती सिमित आहे. मराठवाड्यातील तमाशा आणि लावणीप्रमाणे बहुरंगी नमनाला राज्यात व्यासपीठ निर्माण व्हावे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयामार्फत (Maharashtra State Cultural Directorate) बहुरंगी नमनाचे प्रयोग महाराष्ट्रात व्हावेत. राज्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये या लोककलेला स्थान मिळावे. लोककलेमध्ये अनिष्ट गोष्टीचा शिरकाव होवू नये. लोककलेचा अभ्यास करणाऱ्या लोकांची संख्या वाढावी. असे अनेक उद्देश संस्थेसमोर आहेत. या उद्देशांकडे वाटचाल सुरु झाली की नमन कलाकारांना आणखी रोजगार मिळेल. प्रतिष्ठा प्राप्त होईल. लोककलेचे संवर्धन होईल.
Related News
कोकण नमन लोककला मंचाची स्थापना
शिमगोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर