मयुरेश माने, सहा. शिक्षक (MIE EXPERT 2023), रत्नासागर इंग्लिश स्कूल दहिवली बु.||, ता.चिपळूण , जि.रत्नागिरी
विश्वास शंकर माने हे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शिक्षण शेत्रातील मातब्बर, नावाजलेलं नांव………. एक आदर्श सहकारी, शिक्षक, तत्वनिष्ठ, करारी, शिस्तप्रिय, मुख्याध्यापक, उत्तम प्रशासक, शैक्षणिक कायदेतज्ञ तरीही कुटुंबवत्सल, संवेदनशील, हळव्या मनाचा बाप अशी अनेक रूपे अनेकांनी अनुभवलेली आहेत., समाजातील तळागाळातील रंजल्या गांजलेल्या पण गरिबीमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या मुलांना कौशल्याने पुन्हा शिक्षण प्रवाहात आणून त्यांना यशस्वी माणूस, उद्योजक, विविध मानाची पदे भूषविण्यास लायक बनविण्याची जादू त्यांनी खूपदा करून दाखवली आहे. My ideal father

एक वडील म्हणून अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, ते स्वतः बाप झाल्यावर उमगते आहे. १९९० दशकात गुहागर तालुक्यातील श्री.देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथे आमचे पप्पा नोकरी करायला आले. तेव्हा आतासारख्या फारशा सोयी- सुविधा नव्हत्या. तरीही सुरूवातीच्या कालावधीत गुहागर खालचापाट आम्ही भाड्याच्या घरात राहिलो. पण आम्ही तिघे जण भाऊ असून सुद्धा आमच्या शिक्षणाकडे त्यांचे वैयक्तिक लक्ष असायचे. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तीची अडचण समजून घेवून ती कायदेशीर आणि कमीत कमी भांडण तंटा करून सोयीस्कर तोडगा काढण्यासाठी ते प्रयत्नशील असायचे. त्याला योग्य ते मार्गदर्शन करायचे. आमच्या वडिलांनी लहानपणापासून कमालीची गरिबी अनुभवलेली होती… त्या गरीबीचे चटके आपल्या कुटुंबाला बसू नयेत याची सर्वतोपरी काळजी घ्यायचे. My ideal father

आमचे पप्पा संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे. त्यामुळे ते इतरांना कोणी वेगळे वाटलेच नाहीत… त्यांनी आपल्या गावासाठी, समाजासाठी प्रबोधन करण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब केला. प्रसंगी स्वतः कमीपणा घेवून समाज, समाजातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक परीस्थिती कशी सुधारेल याकडे जातीने लक्ष दिले आहे. प्रत्येक व्यक्तीला जमेल तशा स्वरुपात कधी आर्थिक, कधी मार्गदर्शकाच्या स्वरुपात मदत करूनही आपले नांव गुपित कसे राहील याकडे लक्ष दिले. कारण बरेचदा उपकाराच्या ओझ्याखाली व्यक्ती दबून जावून इच्छित ध्येयाला मिळवण्यास असमर्थ ठरतो.

मुळात कुटुंबवत्सल, संवेदनशील, हळव्या मनाचा बाप आणि मायाळू आजोबा याचा अनुभव आम्ही घेतला आहे. कारण मी घरात शेंडेफळ पण आम्हा तिन्ही भावंडांची विवाह झाल्यावर माझ्या २०१२ साली आमच्या घरात किंवा घराण्यात पहिली मुलगीचा जन्म झाला. त्यानंतर सर्व कुटुंबात धृविका माझी मुलगी लाडकी होती. अजूनही आहे. कारण पहिले नातवंड आजी आजोबांना खूप खूप प्रिय आणि हृदयाजवळचे असते. म्हणून त्याचे लाड सर्वाधिक होतात. आम्हा तिन्ही मुलांचे वाढदिवस, आवड निवड , कौशल्ये, तसेच अंगभूत कलांचा अभ्यास त्यांनी केल्याने प्रत्येकाच्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत आहोत. My ideal father

पण सेवानिवृत्त झाल्यावर राहिलेले आयुष्य मनसोक्त जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आम्हा तिन्ही मुलांच्या चार नातवंडांचे लाड आणि माया करायला त्यांनी पैसा आणि वेळ पाहिला नाही. पण एकच खंत मनात आहे की त्यांनी त्यांच्या मनात काय चालू आहे ? याची कोणालाही कल्पना दिली नाही. आणि आम्हीही त्यांचे मन वाचायला कमी पडलो. एवढ्या साऱ्या कालावधीत ते कधीही एखाद्या मोठ्या आजाराने दवाखान्यात दाखल झाल्याचे ऐकिवात नाही. पण सततच्या प्रवासामुळे पाठीच्या दुखण्याने हैराण झाले होते एवढे निश्चित ! My ideal father

खर तर कोरोना आल्यामुळे त्यांच्या प्रवासावर बंधन आली होती. लॉकडाऊन झाल्यावर मात्र ते हतबल झाले होते. प्रत्येक जण आपल्या नोकरी वा व्यवसायाच्या कारणाने आपल्या आहे त्या ठिकाणी होता. त्यामुळे त्यांना त्यावेळी सर्व मुलांनी, नातवंडांनी घरी रहावे. नातवंडाना खेळताना मनसोक्त पाहावे हे स्वप्न कोरोना काळामुळे पूर्ण होवू शकले नाही. पण आमचे पप्पा परिस्थितीला शरण जातील कसे ? त्यांनी चंगच बांधला कोणत्याही प्रकारे आपल्या सर्व मुलांना आणि नातवंडांना भेटायचे. त्यांचा लाड करायचा. त्यांनी शक्य होईल तोवर आपल्या सुनांकडून ही आवडत्या पदार्थांची फर्माईश लक्षात ठेवून पूर्ण करून घेतल्या. पण शेवटी काळाच्या आवेगामुळे किंवा सत्य परिस्थितीमुळे ते स्वतःची पुरेपूर काळजी घेतच होते. या कालावधीतही त्यांना आपल्या सख्या बहिणीच्या तब्येतीची काळजी असल्याने आणि आमची आईही आजीजवळ असल्याने कोणत्याही पद्धतीने त्यांच्या जवळ पोहोचून मदत करावी असा उद्देश होता. याच संकटाच्या वेळी त्यांनाही कोरोना सदृश्य रोगाची कुठे आणि कसे संक्रमण झाले हे त्यांनाही कळलेही नाही. त्यांची तब्येत हळूहळू बिघडत चालली होती. विविध प्रकारच्या चाचण्या केल्या गेल्या ; औषधोपचार सुरु होते पण गुण येत नव्हता. नेमक काय झाले याचा उलगडा लवकर होत नसल्याने उपचारावर मर्यादा पडत होत्या. पण बहुतेक त्यांना आपल्या एक्झिटची चाहूल लागली असावी. My ideal father

आमच्या पप्पांना इकडे रुग्णालयात दाखल करून एक दिवस ही झाला नव्हता तोवर आमची आजी (पप्पांची बहिण) गेल्याची बातमी आली. आमच्या काळजात धस्स झाले… ही बातमी पप्पांपर्यंत पोहोचू नये यासाठी खूप प्रयत्न केले. पण सार काही व्यर्थ ठरले नियतीपुढे… पप्पांची ऑक्सिजन लेव्हल कमी होत चालली होती. आणि आवश्यक इंजेक्शन मिळत नव्हते. शेवटी शेवटी इंजेक्शनचा डोस देवून पप्पांना वाचवण्याचा अखेरचा प्रयत्न करण्यात आला. तोही यशस्वी होईलच याची खात्री नव्हतीच…. अखेरीस २३ सप्टेंबर २०२० रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. आमचे लाडके पप्पा आम्हाला सोडून गेले. व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर आपण असं केलं असत आणि तसं केलं असत असा विचारच फक्त करत बसतो. पण त्याक्षणी आपल्याला योग्य त्या सूचना मिळणे अथवा योग्य गोष्टी सुचतच नाहीत हे मात्र खरे….आज त्यांचा द्वितीय स्मृतीदिनानिमित्त माझ्या भावना मोकळ्या करत आहे. My ideal father
बाबा
बाबा तुम्ही नसता तर
आम्ही हे जग पाहिलेच नसते.
जीवनातील प्रत्येक टप्प्यावर
नवीन सुख चाखलेच नसते. ।।1।।
बाबा तुम्ही नसता तर
कोणी माझ्या बरोबर खेळलेच नसते.
या तंत्रज्ञानाच्या जगात राहूनसुद्धा.
लॅपटॉप, मोबाईल पाहिलेच नसते. ।।2।।
बाबा तुम्ही नसता तर
मी हट्ट कोणाकडे केला असता?
अन् माझी बिकट अवस्था पाहून
बिचार्या आईचा पदर भिजला असता ? ।।3।।
बाबा तुम्ही नसता तर कशासाठी
जगायचं याचं उत्तर कळालेच नसते.
नात्यांची गुपिते उकलून सुद्धा
आठवणीत कसे गुंफले असते. ।।4।।
बाबा तुम्ही नसता तर
संस्कारांचा अविरत पाऊस मी झेलला नसता.
आसवांची सोबत घेऊन सुद्धा जिंदगीभर
माणुसकीचा धडा गिरवलाच नसता. ।।5।।
श्री.देव गोपाळ कृष्ण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालययाचे शिक्षक श्री. माने सर यांना भावपूर्ण श्रध्दांजली
