आ. भास्कर जाधवांच्या टीकेचा घेणार समाचार
गुहागर, ता. 13 : भाजपाचे नेते माजी खासदार डॉ. निलेश राणे हे दि. १६ फेब्रुवारी रोजी गुहागर दौऱ्यावर येत आहेत. याच दिवशी सायंकाळी ४.४५ वा. तालुक्यातील शृंगारतळी येथील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या पटांगणात जाहीर सभा घेऊन विरोधकांचा समाचार घेणार आहेत. MP Nilesh Rane in Sringaratali
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सुर्यकांत दळवी, भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, प्रदेश, जिल्हा, तालुका आजी माजी पदाधिकारी, सदस्य तसेच बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग दौरा केला होता. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासह गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या मुलाविरोधात टीका केली होती. या टीकेनंतर राणे कुटुंबीय आ. जाधव यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांच्याच मतदार संघात जाऊन समाचार घेण्याचा चंग माजी खा. निलेश राणे यांनी बांधला आहे. होणाऱ्या या सभेबाबत गुहागरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आ. भास्कर जाधव यांचा समाचार घेणार असे स्टेटस् ठेवून या सभेकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. MP Nilesh Rane in Sringaratali