आमदार जाधव, जीवे मारण्यांच्या धमक्यांनी कुटुंब हादरलयं
Guhagar News : यापुढे निलेश राणेंच्या कोणत्याही टिकेला उत्तर देणार नाही. त्यांना 16 तारखेला गुहागरात काहीही बोलु दे, मी बेदखल करुन टाकले आहे. असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी टाईम्स डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. मला बाळासाहेबांनी 1995 मध्ये पहिल्यांदा उमेदवारी दिली निर्णायक क्षणी नारायणराव आणि कै. दत्ताजी साळवी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. असेही यावेळी आमदार जाधव यांनी सांगितले. MLA Bhaskar Jadhav Interview
टाईम्स डिजिटल या रत्नागिरी टाईम्सच्या युट्यूब चॅनेलवर पत्रकार सुनील साळवी यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमधील पहिलाच मुद्दा राणे आणि जाधव यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरीबाबत होता. यासंदर्भात बोलताना आमदार जाधव म्हणाले की, राजकीय भाषणबाजीत मी कितीही आरोप केले तरी आजपर्यंत कोणावरही वैयक्तिक टिका केली नाही. राजकीय नेत्यांच्या कुटुंबाबाबत काही बोललो नाही. एकाच मंत्रीमंडळात नारायणराव (Narayan Rane) कॅबिनेट मंत्री व मी राज्यमंत्री असताना त्यांनी मंडणगड पासून रत्नागिरीच्या दौऱ्याला सुरवात केली. या दौऱ्यातील अनेक भाषणात त्यांनी माझ्यावर टिका केली. तरीही दाभोळ वरुन फेरीबोटीने ते धोपाव्यात उतरले तेव्हा त्यांच्या स्वागताला मी माझ्या कार्यकर्त्यांना पाठवले होते. त्यानंतरही शृंगारतळीत नारायणरावांनी माझ्यावर अत्यंत खालच्या भाषेत टिका केली. 2010 पर्यंत ते माझ्यासाठी आदरार्थीच होते. त्यांचे आणि माझे उत्तम कौटुंबिक संबंध होते. त्यानंतर सावर्डा येथे विजयराव गुजर यांच्या दुकानाच्या उद्घाटनाचे वेळी मी भाषण केले. वास्तविक त्या भाषणात मी नारायणराव राणेंना धरुन कोणतीही टिका केली नव्हती. त्यातील ज्या शब्दांचा संदर्भ माझ्याशी जोडला जातो त्याच्याशी माझा संबंध नव्हता. त्याबाबत नारायणरावांनी थेट मला विचारले असते तर मी जे झाले ते सांगितले असते. मात्र त्यांच्या मुलाने (Nilesh Rane) माझे चिपळूणचे कार्यालय फोडले. हातपाटीच्या वाळु व्यावसायिकांच्या जीवावर मी कुटुंब चालवतो हा आरोप केला गेला. चिपळूणला आल्यानंतर निलेश राणेंनी माझ्या बायका मुलांबद्दल बोलला. माझे घर जाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कोकरे महाराजांची जमीन मला हवीय असा खोटा आरोप केला. इतके झाले तरी आम्ही गप्प बसायचे ही अपेक्षा का. निलेश राणेंनी माझ्या वडिलांबद्दल बोलले. नारायणरावांची मुले त्यांच्या हाताबाहेर गेली आहेत. त्यांनी काहीही बोलावे बाकीच्यांनी ते सहन करावे हे चालणार नाही. पण आता निलेश राणेंच्या वक्तव्याला कोणतीही किंमत न देण्याचा निर्णय मी घेतला आहे. MLA Bhaskar Jadhav Interview
15 लाखाच्या आरोपसंदर्भात बोलताना आमदार जाधव म्हणाले की, 1995 साली पहिल्यांदा बाळासाहेबांनी मला तिकीट दिले त्या निर्णायक क्षणी कै. दत्ताजी साळवी आणि नारायणराव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. या वाक्यापासून मी कधीही मागे हटणार नाही. ते ज्या 15 लाख रुपयांबाबत बोलत आहेत तेही मी परत देईन मात्र त्यासाठी दोघांनी एकत्र बसुन प्रमाण करावे लागेल. नारायणराव मला काहीही बोलले तरी मी ते फारसे मनावर घेत नाही. माझी मुलांनी देखील कधीही नारायणरावांवर, त्यांच्या मुलांवर टिका केलेली नाही. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. नारायणरावांचा आम्ही मान राखतो. पण याचा अर्थ त्यांच्या मुलांने आमच्या बायका मुलांबद्दल, आई वडिलांबद्दल काही बोलले तरी आम्ही सहन करावे असा होत नाही. हे संस्कार आहेत, ही संस्कृती आहे तुमची. नारायणरावांनी त्यांच्या मुलांना सांगितले तर आपोआप वाद थांबतील. मात्र आता मी त्यांना बेदखल करुन टाकले आहे. त्यांच्या कोणत्याही आरोपाची यापुढे भास्कर जाधव दखलच घेणार नाही. MLA Bhaskar Jadhav Interview
माझ्या मोबाईलवर अनेकांच्या धमक्या आल्या आहेत. या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत. पण त्याचा उपयोग काय, सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. अभिजीत घोसाळकरची हत्या झाली. जळगांवमध्येही हत्या झाली. सभागृहात घर जाळण्याचा मुद्दा उपस्थित केला त्याकडे सरकारने गांभिर्याने पाहीले नाही. तर फोनवर येणाऱ्या धमक्यांकडे हे काय पहाणार. सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) हैदोस सुरु आहे. 2024 मध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकात (Election) होत नाहीत तोपर्यंत हे असेच चालणार आहे. त्याला घाबरुन काय करणार. माझे कुटुंब मात्र हादरुन गेले आहे. माझा यंत्रणेवरील विश्र्वासच उडालेला आहे. नियतीच्या मनात जे असेल ते होईल आणि त्याचा हिशोबही नियतीच करेल यावर माझा ठाम विश्र्वास आहे. असेही या मुलाखतीदरम्यान आमदार जाधव यांनी सांगितले. MLA Bhaskar Jadhav Interview