शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा निर्धार
गुहागर, ता. 08 : गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे गुहागर तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक गटशिक्षणाधिकारी श्री. रायचंद गळवे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी मागील सभेच्या वेळी झालेल्या विविध विषयांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. Meeting of Teachers’ Union Coordinating Committee
गुहागर तालुका शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये अग्रेसर राहावा, म्हणून शिक्षक संघटनेने पुढाकार घेतला असून त्यासाठी अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करण्यात यावी अशी विनंती गटशिक्षणाधिकारी यांना करण्यात आली. पंचायत समिती द्वारे शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा भडिमार होऊ नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शिक्षकांना स्वयंप्रेरणेने काम करता यावं म्हणून गुणवत्ता विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली. महिलांना बीएलओ कामातून कार्यमुक्त करण्यात यावे व जे स्वेच्छेने काम करण्यास शिक्षक तयार आहेत त्यांना आदेश देण्यात यावेत, याबाबत विचार विनिमय करण्यात आला. शिक्षकांची प्रलंबित वैद्यकीय बिले, पगार बिले, आधी प्रश्न वेळीच मार्गी लावावेत असे ठरले. तसेच शालेय गणवेश योजना, शालेय पोषण आहार योजना यासारख्या विद्यार्थी हिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनाला सूचना करण्यात आल्या. यावेळी सर्व शिक्षक संघटनांनी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षा यांच्या माध्यमातून विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे अभिवचन देण्यात आले. Meeting of Teachers’ Union Coordinating Committee
यावेळी गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांनी शिक्षण विभागामध्ये विविध उपक्रम राबवित असताना शिक्षक संघटनांचे बहुमोल असे सहकार्य लाभत असते. यापुढेही आपण शिक्षक संघटनेच्या समन्वयाने वाटचाल करणार आहोत असे ते म्हणाले. यावेळी रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे व्हा. चेअरमन अरविंद पालकर, शिक्षक नेते कैलास शार्दुल, केंद्रप्रमुख संघटनेचे विश्वास खर्डे, शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र कुळे, कास्ट्राईब शिक्षक संघाचे अध्यक्ष सुहास गायकवाड, सरचिटणीस वैभवकुमार पवार, अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील, शिक्षक समितीचे सरचिटणीस नरेंद्र देवळेकर, अपंग शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष अमोल धुमाळ, प्रभू हंबर्डे, प्रथमेश देसाई आदी उपस्थित होते. शेवटी अमोल धुमाळ यांनी सर्वांचे आभार मानले. Meeting of Teachers’ Union Coordinating Committee