कोकणकन्या शमिका भिडे च्या गायनाने रंगणार
रत्नागिरी, ता. 11 : खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची 300 वी मासिक संगीत सभा शनिवार दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळात गुरुकृपा मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे. यामध्ये झी मराठी सारेगमप लिटल चॅम्पमधून घराघरात पोहोचलेली कोकणकन्या शमिका भिडे हिच्या शास्त्रीय तसेच अभंग, नाट्यगीताने ही मैफल रंगणार आहे. ही सभा (कै.) शुभांगी रामचंद्र रानडे व (कै.) रामचंद्र दत्तात्रय रानडे स्मृती संगीत सभा म्हणून साजरी होणार आहे. Meeting of Khalvayan Sanstha
खल्वायनच्या मैफलीत हार्मोनिअम चैतन्य पटवर्धन, तबला हेरंब जोगळेकर, पखवाज मंगेश चव्हाण आणि तालवाद्यसाथ अद्वैत मोरे करणार आहेत. खल्वायनची ८ नोव्हेंबर १९९७ रोजी दुसऱ्या शनिवारी पहिली मासिक संगीत सभा संपन्न झाली. कोरोना महामारीचा दिड वर्षाचा काळ वगळता १९९७ पासून आजपर्यंत सलग ३०० महिने दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारचा हा उपक्रम संस्थेने यशस्वीरीत्या आयोजीत केला आहे. Meeting of Khalvayan Sanstha
सारेगमप लिटल चॅम्प्सच्या २००८ मधील पर्वात घराघरांत पोहचलेली शमिका हिचे संगीतातील प्राथमिक शिक्षण प्रसाद गुळवणी व सौ. मुग्धा भट- सामंत, यांच्याकडे रत्नागिरीतच झाले. गेली १२ वर्ष विदूषी डॉ. अश्विनी भिडे- देशपांडे यांच्याकडे जयपूर अत्रौली घराण्याची तालीम व सांगितिक संस्कार प्राप्त करण्याचं भाग्य तिला मिळालं. आपल्या गुरु व आई वडिलांच्या आशिर्वादाने अनेक पुरस्कारांची मानकरी असलेली शमिका आज अनेक दिग्गज कलाकारांसोबत विविध संगीत कार्यक्रमांमधून रसिकांपर्यंत आपली कला सादर करत आहे. शमिकाने दे धक्का, सोयरिक, पल्याड चित्रपटांसाठी पार्श्वगायन, कलर्स मराठी, सोनी मराठी, शीमारू या चॅनलसाठी टायटल साँग्स गायली आहेत. संगीत मेघदूत व संगीत चि. सौ. कां. रंगभूमी या संगीत नाटकांमध्ये भूमिका केली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद २०१९ सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्री पुरस्कार, दादर माटुंगा कल्चरल सेंटर मुंबई- उदयोन्मुख गायिका अभिनेत्री पुरस्कार, झी टॉकीज महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२२ मध्ये सर्वोत्कष्ट पार्श्वगायिका नामांकन, झी मराठी लिटल चॅम्प्स २०२३ साठी मेंटॉर, ५० हून अधिक स्वतंत्र गाणी रिलीज झाली आहेत. तिने अनेक अल्बममध्ये गायन, अनेक संगीत महोत्सवांमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत मैफिलीत गायन केले आहे. Meeting of Khalvayan Sanstha
नेहमीप्रमाणेच ही मासिक संगीत सभा सर्व रसिकांना विनाशुल्क असून, सर्व रसिकांनी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी गुरुकृपा मंगल कार्यालयात यावं, अस आवाहन संस्था अध्यक्ष मनोहर जोशी व त्यांचे सर्व सहकारी यांनी केले आहे. Meeting of Khalvayan Sanstha