पर्यटन खात्यातर्फे ६० लाखांचा निधी; सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यांचा समावेश
गुहागर, ता. 24 : महाराष्ट्रातील ऐतिहासिक वैभवाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्यानंतर आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट १२ महत्वपूर्ण किल्ल्यांच्या परिसरात भव्य ‘गडकिल्ले महोत्सव’ आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २३ जून रोजी एका शासन निर्णयाद्वारे या महोत्सवांतर्गत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या खर्चासाठी एकूण ६० लाख रुपयांच्या निधीला अंतिम वित्तीय मान्यता दिली आहे. ‘Mahotsav’ to be held at forts
या निर्णयानुसार प्रत्येक किल्ल्याच्या परिसरातील कार्यक्रमासाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील रायगड, प्रतापगड, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग व सिंधुदुर्ग या ११ तर तमिळनाडू येथील जिंजी अशा एकूण १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश आहे. या सर्व किल्ल्यांवर भव्य स्वरुपात सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. सन २०२६-२७या आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेल्या ‘राज्य कला संस्कृती जतन, संवर्धन विविध महोत्सव’ या लेखाशीर्षांतर्गत हा खर्च भागवला जाणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनानंतर एका महिन्याच्या आत सांस्कृतिक कार्य संचालनालयाला खर्चाचे सविस्तर उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे लागणार आहे. हा शासन निर्णय वित्त विभागाच्यासहमतीने आणि डिजिटल स्वाक्षरीने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘Mahotsav’ to be held at forts

या महोत्सवातून किल्ल्यांचे मूळ ऐतिहासिक महत्व टिकून राहते, की हा केवळ एक सरकारी सोहळा ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पर्यटन सुविधा, स्वच्छतेऐवजी केवळ उत्सवांवर भर? शासनाने या ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असले तरी यानिमित्ताने दुर्गप्रमी आणि पर्यटकांमधून काही सवालही उपस्थित केले जात आहेत. किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या मुलभूत सुविधा, अधिकृत माहिती केंद्रे आणि गडांची नियमित स्वच्छता यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि दीर्घकालीन गरजांकडे शासनाने प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, दुर्ग संवर्धन आणि पर्यटनाचे ठोस व पायाभूत प्रश्न बाजूला सारून प्रशासनाने केवळ तात्पुरत्या स्वरुपातील महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाच जास्त महत्त्व दिल्याचा सूर आता उमटू लागला आहे. ‘Mahotsav’ to be held at forts
