लोणावळ्यात एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले
गुहागर, ता. 01 : रविवारी लोणावळ्यातील भुशी धरणातून वाहणाऱ्या प्रवाहातील धबधब्यात आनंद लुटण्यासाठी गेलेल्या हडपसर पुणे येथील अन्सारी परिवारातील 5 जण वाहून गेले. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. तेव्हा आपणही वर्षा सहलींचा आनंद लुटण्यासाठी नदी, धबधबे या ठिकाणी जाताना अतिउत्साह दाखवून नका. क्षणभंगुर आनंद मिळविण्याचा प्रयत्न आपल्याला, आपल्यासोबत आलेल्या आणि आपल्या पाठी घरात असणाऱ्या आपल्या परिवारांसाठी दु:खाचा ठरु शकतो. असे आवाहन आम्ही गुहागर न्यूज द्वारे करीत आहोत. Lonavala bhushi dam incident


पावसाळा सुरु झाला की लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात शेकडो पर्यटक आपल्या परिवारासह धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी जात असतात. या सर्वांना पाण्यात खेळण्याचा आनंद लुटता यावा यासाठी धरण परिसरातच व्यवस्था आहे. येथे काही सुरक्षा रक्षकही तैनात असतात. ते सावधनेच्या सूचनाही करत असतात. तरीदेखील काही मंडळी या ठिकाणी न जाता भुशी धरणातील पाणी प्रवाहीत होते अशा आडमार्गावरील जंगल परिसरातील धबधब्यांवर जातात. अशाच एका धबधब्यावर अन्सारी परिवार गेला होता. उत्साहाच्या भरात या कुटुंबातील मंडळी धबधब्यातील एका दगडावर मध्यभागी जावून थांबली. दरम्यान पाण्याचा प्रवाह कधी वाढला हेच त्यांना कळले नाही. सुरक्षित ठिकाणी येण्याचा त्यांचा मार्ग बंद झाला. धबधब्याजवळ असलेली अन्य मंडळी त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्नरत होती. मात्र आडबाजुला असलेल्या धबधब्यावर जीव वाचविण्यासाठी कोणतीच सामुग्री नसल्याने अखेर अन्सारी कुटुंबातील एक महिला, आणि 4 ते 13 वयोगटातील 4 मुले वेगवान प्रवाहात वाहून गेली. Lonavala bhushi dam incident


स्थानिक पोलीस, शिवदुर्ग मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिकांनी तातडीने वाहून गेलेल्याचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र दुर्दैवाने या मोहिमेत शाहिस्ता लियाकत अन्सारी (वय 37), अमिना सलमान अन्सारी (वय 13), उमेना सलमान अन्सारी (वय 8) यांचे ही तिघजण मृतावस्थेत सापडली. सोमवारी सकाळी मारिया अकिल सय्यद (वय 9) या मुलीचा मृतदेह सापडला. अजुनही ४ वर्षाचा मुलगा अदनान अन्सारी या बेपत्ता आहे. ही घटना रविवार, 30 जुनला दुपारी घडली. Lonavala bhushi dam incident


Guhagar News appeal
कोकणातील जंगलातील, आडमार्गावरील अनेक धबधबे पावसाळा सुरु झाल्यावर प्रवाहीत होतात. या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी अनेक तरुण मंडळी जातात. तसेच नदीमध्ये पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी, मासे पकडण्यासाठी जाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. यामध्ये पर्यटकांपेक्षा स्थानिकांचा सहभाग जास्त असतो. त्याचबरोबर महामार्गाच्या बाजुला पर्यटक धबधब्यांचा आनंद लुटतात. या सर्वांना कळकळीची विनंती आहे की, क्षणभंगुर आनंद मिळविण्यासाठी कोणताही धोका पत्करु नका. सेल्फी काढण्यासाठी, रिल्स बनविण्यासाठी आणि त्यातून हजारो लाईक्स मिळविण्यासाठी तुमचे आयुष्य धोक्यात घालु नका. आपण वर्षा सहलींना जाताना आनंदापेक्षाही आपल्या सुरक्षाचा प्राधान्याने विचार करावा. असे आवाहन गुहागर न्यूजद्वारे आम्ही करत आहोत. Lonavala bhushi dam incident