अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूण आयोजित
गुहागर, ता. 16 : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने आयोजित बालनाट्य प्रशिक्षणाचा शुभारंभ नुकताच शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात लोकमान्य टिळक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, कार्याध्यक्ष दिलीप आंब्रे, बालनाट्य प्रशिक्षणाचे प्रशिक्षक सुरेश गायधनी आदी उपस्थित होते. Launch of children’s drama Training
अनेक वर्षे बंद असलेली नाट्य परिषदेची चिपळूण शाखा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या शाखेचा बालनाट्य प्रशिक्षण शिबीर हा पहिलाच कार्यक्रम होत असून या शिबिराला पालक, विद्यार्थी यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरासाठी खास नाशिकहून सुरेश गायधनी उपस्थित आहेत. गेले ३० ते ४० वर्षे बालनाट्य प्रशिक्षण घेण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी नाट्य परिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिरामधून मुलांचा व्यक्तिमत्व विकास निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Launch of children’s drama Training
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले. सूत्रसंचालन छाया पोटे यांनी तर उपाध्यक्ष योगेश बांडागळे यांनी आभार मानले. यावेळी विभावरी रजपूत, प्राध्यापिका संगीता जोशी, संकेत हळदे, मंगेश बापट, आदिती देशपांडे, ओंकार रेडीज, डॉ. मीनल ओक, संजय कदम आदी उपस्थित होते. दि. २० मे पर्यंत हे बालनाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू राहणार आहे. २० मे रोजी शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांची दोन बालनाट्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या रंगमंचावर सादर होणार आहेत. Launch of children’s drama Training