प्रशासन आणि एनडीआरएफकडून दोघांचा शोध; पालकमंत्री उदय सामंत
गुहागर, ता. 07 : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आज जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, काल रात्री खेड तालुक्यातील दहिवली येथे डोंगराचा भाग खचून दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असून प्रशासन आणि एनडीआरएफचे (NDRF) पथक घटनास्थळी मदतकार्य करत असल्याची माहिती पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी दिली. ते चिपळूण येथील पाऊस परिस्थिती व मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. Landslide incident in Khed
काल रात्री खेड तालुक्यातील दहिवली येथे कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली ३ व्यक्ती अडकल्या होत्या. त्यापैकी एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला आणि एनडीआरएफला यश आले आहे. मात्र, इतर दोन व्यक्ती अद्याप बेपत्ता असून, ढिगाऱ्याखाली दाबले गेल्यामुळे त्यांच्या जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याचे एनडीआरएफने कळवले आहे. तरीही त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे तातडीने ४ लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच कशेडी येथील भूस्खलन झालेल्या भागाची पाहणी केली असून बाधित दोन कुटुंबांना शासनामार्फत मदत करण्यात आली आहे. Landslide incident in Khed

डोंगरकडा किंवा दरडप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. “आपला जीव सर्वात महत्त्वाचा आहे, अनेकदा नागरिकांची घर सोडण्याची मानसिक तयारी नसते, मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाला सहकार्य करा आणि तात्काळ सुरक्षित स्थळी शिफ्ट व्हा,” असे आवाहन पालकमंत्री डाॕ सामंत यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. Landslide incident in Khed
खेड बाजारपेठ, तसेच चिपळूणमधील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितले की, वाशिष्ठी आणि जगबुडी नद्यांमधील गाळ काढल्यामुळे यंदा मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी मुसळधार पाऊस झाल्यावर ज्या गतीने शहरात पुराचे पाणी वाढत होते, ती पातळी आता गाळ उपशामुळे नियंत्रणात आहे. भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी चिपळूण येथे विशेष बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी जीव ओतून नागरिकांसाठी काम करत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचेही पालकमंत्री म्हणाले. Landslide incident in Khed
