मुंबई, ता. 19 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी ४० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत. परंतु, निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते महिलांना मिळू शकणार नाहीत. कारण, तात्पुरत्या स्वरुपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे. Ladaki Baheen Yojana Suspended
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. Ladaki Baheen Yojana Suspended


आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजना त्वरीत थांबवल्या पाहिजेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या. तसेच, आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा आढावाही घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांकडे याबाबतची विचारणा केली. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचं समोर आले. त्यामुळे विभागाकडून या योजनेची माहिती मागवण्यात आली आहे. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला देण्यात आली. परिणामी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. Ladaki Baheen Yojana Suspended