खेलो इंडीया युथ गेम्स २०२२-२३
गुहागर, ता. 02 : मुष्टीयुद्धामध्ये महाराष्ट्राच्या देविका घोरपडे हिने उपांत्य फेरीत स्थान मिळवित पदक निश्चित केले आहे. ५२ किलो गटात तिने हरियाणाच्या अंजली कुमारी हिचा सहज पराभव केला. तिने प्रारंभापासूनच या लढतीत आपले वर्चस्व राखले होते. महाराष्ट्राच्या अभिषेक जांगिड, कुणाल घोरपडे यांनी आगेकूच कायम राखली. भोपाळ येथील तात्या टोपे क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील ७५ किलो गटात अभिषेक याने अरुणाचल प्रदेशचा खेळाडू रिंचन देपका याचा ५-० असा धुव्वा उडविला. Khelo India Youth Games 2022-23
या लढतीत त्याने तीनही फेऱ्यांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला ठोसेबाजी करण्यास फारशी संधी दिली नाही. त्याने जोरदार आक्रमक शैली आणि भक्कम बचाव अशा दुहेरी तंत्राचा उपयोग करीत या लढतीत निर्विवाद वर्चस्व गाजविले. ७१ किलो गटात महाराष्ट्राच्या कुणाल घोरपडे याला आसामच्या हेमंत छेत्री याच्याकडून पुढे चाल मिळाली. पुरुषांच्या ५४ किलो गटात महाराष्ट्राच्या नीरज राजभर याचे आव्हान मात्र संपुष्टात आले. त्याला हरियाणाच्या आशिष कुमार याने ५-० असे पराभूत केले. आशिष याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र घेतला होता. त्याच्या तुलनेत नीरज याला अपेक्षेइतका बचाव करता आला नाही. Khelo India Youth Games 2022-23
नेमबाजीत पदकांच्या आशा कायम महाराष्ट्राच्या रणवीर काटकर व पार्थ माने यांनी दहा मीटर्स एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी स्थान मिळवले आणि पदकाच्या आशा कायम राखल्या. या क्रीडा प्रकारातील प्राथमिक फेरीनंतर रणवीर याने चौथे स्थान घेतले असून त्याने प्राथमिक फेरीत ६२५.६ गुण नोंदविले. पार्थ हा पाचव्या स्थानावर आहे. त्याने प्राथमिक फेरीत ६२४.९ गुण नोंदविले आहेत. Khelo India Youth Games 2022-23