शेखर विचारे, अशोक देवळे, अनंत रांगळे बक्षिसाचे मानकरी
गुहागर, ता. 26 : राज्यस्तरीय खरीप पिक स्पर्धेचा निकाल (Kharip Crop Competition Result) जाहीर झाला असून नाचणी पिक स्पर्धेत ठाणे विभागात गुहागर तालुक्यातील शेखर विचारे, वरवेली यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर अशोक देवळे, अडूर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. भात पीक स्पर्धेत जिल्हास्तरावर अनंत भिवाजी रांगळे, पोमेंडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. Kharip Crop Competition Result

राज्य सरकारने सन 2022-23 या वर्षात खरीप पिक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये राज्य, विभाग, जिल्हा व तालुका अशा चार स्तरांवर क्रमांक काढण्यात येणार होते. प्रत्येक स्तरावरील सरासरी पिकापेक्षा जास्त पिक घेणारे शेतकरीच त्या स्तरासाठी पात्र होतील. तसेच ज्या स्तरासाठी शेतकरी पात्र झाला असेल त्या खालील स्तरावर त्या शेतकऱ्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही. या स्पर्धेच्या महत्त्वाच्या अटी होत्या. भात उत्पादनामध्ये गुहागर तालुक्यातील शेतकरी राज्य आणि विभाग स्तरासाठी पात्र ठरले नाहीत. मात्र जिल्हास्तरासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांमध्ये गुहागर तालुक्यातील पोमेंडीचे शेतकरी अनंत भिवाजी रांगळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी आपल्या शेतात 87.38 किलो प्रति गुंठा या प्रमाणात भात उत्पादित केले. त्यांना रोख रु. 10 हजार व सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. Kharip Crop Competition Result

भात उत्पादनामध्ये गुहागर तालुक्याचे सरासरी क्षेत्र 3889 असून सरासरी 30.75 किलो प्रति गुंठा भात उत्पादन होते. यापेक्षा जास्त उत्पादन घेणारे आणखी तीन शेतकरी तालुकास्तरावरील स्पर्धेत यशस्वी झाले. तालुकास्तरावरील स्पर्धेत तळवली येथील नीलेश दामोदर पवार यांनी 66.72 किलो प्रति गुंठा भात उत्पादन करत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना रु. 5 हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे. नागझरी येथील चंद्रसेन केशव झगडे यांनी प्रति गुंठा 64.77 किलो भात उत्पादन केले. त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्यांना रु. 3 हजारचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर तृतीय क्रमांक प्रति गुंठा 60.19 किलो भात उत्पादन करणाऱ्या डाफळेवाडीतील रामचंद्र भागोजी डाफळे यांनी मिळवला. त्यांना रु. 2 हजाराचे पारितोषिक देण्यात आहे. Kharip Crop Competition Result

गुहागर तालुक्यात सरासरी 21 हेक्टर क्षेत्रात सरासरी प्रति गुंठा 9.96 किलो नाचणी उत्पादन घेतले जाते. तरीही नाचणी उत्पादनात रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, ठाणे, पालघर या पाच तालुक्यांच्या ठाणे विभागात गुहागर तालुका अव्वल राहीला. वरवेलीतील शेखर शिवाजी विचारे यांनी प्रति गुंठा 40.87 किलो नाचणीचे उत्पादन करत ठाणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना 25 हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले अडूरमधील अशोक नाना देवळे. त्यांनी प्रति गुंठश 37.98 किलो नाचणीचे उत्पादन घेतले. त्यांनाही राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत 20 हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे. Kharip Crop Competition Result

गुहागरातील शेतकऱ्यांचे तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, तसेच पंचायत समिती कृषी विभाग तसेच शेतमाल उत्पादन कंपनीने अभिनंदन केले आहे. या स्पर्धेमुळे तसेच शेतकऱ्यांच्या यशामुळे गुहागर तालुक्यातील अनेक शेतकरी यावर्षी गुणवत्तापूर्ण शेती करुन स्पर्धेत सहभागी होतील. असा आशावाद तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. Kharip Crop Competition Result
