‘शेवटची लाओग्राफिया’ या कादंबरीस प्राप्त दुसरा पुरस्कार
गुहागर, ता. 30 : येथील खरे – ढेरे – भोसले महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या “शेवटची लाओग्राफिया” या कादंबरीस नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्यावतीने मानाचा केशवसूत साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी कविवर्य केशवसुत स्मारक समिती यांच्या वतीने कविता अभिवादन सोहळा नुकताच मालगुंड केशवसुत स्मारक येथे पार पडला. या कादंबरीस प्राप्त झालेला हा दुसरा पुरस्कार आहे. अथर्वप्रकाशन जळगाव यांनी ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे. या पुरस्काराबद्दल डॉ. बाळासाहेब लबडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. Keshavsut Literature Award

या कार्यक्रम सोहळ्याचे उद्घाटक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ देऊन प्रा. डॉ. लबडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार समारंभात महाराष्ट्रातील अन्य साहित्यिकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनतर केशवसुताना कवितेतून अभिवादन महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या ३६ कवींनी केले. यात सांगलीहून अभिजित पाटील, मनिषा पाटील, सोलापूरहून डॉ. स्वाती पाटील, पुण्याहून संदीप वाघोले, प्राचार्य मलघे, जीतू सोनवणे, मुंबईहुन संगीता अरबुणे इत्यादी कविंचा सहभाग होता. Keshavsut Literature Award

मराठी कादंबरीला नवा आयाम प्राप्त करून देणारी कादंबरी म्हणजे शेवटची लाओग्राफिया ही कादंबरी असे ज्येष्ठ समीक्षक मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री नामदेव कांबळे, डॉ. संजय नगरकर, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, श्री. भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार बाबाराव मुसळे, श्री. चंद्रकांत पालवे, प्राचार्य साईनाथ पाचारणे, धनाजी घोरपडे, वगैरे अनेक मान्यवर समीक्षकांनी समीक्षा केलेली ही बाळासाहेब लबडे यांची दुसरी नव कादंबरी आहे. Keshavsut Literature Award

