शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल, विद्यापीठाकडे तक्रार केल्याचा संशय
गुहागर, ता. 19 : शहरातील खरे ढेरे भोसले उच्च महाविद्यालयातील चार प्राध्यापकांना बुधवारी (18 डिसेंबर) सकाळी 8.30 च्या दरम्यान 7-8 लोकांनी जबर मारहाण केली. महाविद्यालयातील शैक्षणिक कार्य आणि परिक्षांमध्ये अनेक अवैध कामे चालतात अशी तक्रार मुंबई विद्यापीठाकडे केल्याचा समज करुन संस्थाचालकांनीच ही मारहाण केल्याची तक्रार गोविंद सानप यांनी गुहागर पोलीस ठाण्यात केली आहे. KDB college professor beaten
प्रा. गोविंद सानप यांनी गुहागर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीप्रमाणे, बुधवारी (18 डिसेंबरला) सकाळी 8 वा प्रा. गोविंद सानप, प्रा. संतोष जाधव व प्रा. अनिल हिरगोंड हे तिघे हिरगोंड यांच्या चारचाकी वाहनाने शृंगारतळीहून गुहागर कॉलेजला येत होते. गुहागर चिपळूण मुख्य रस्त्यावरुन खरे ढेरे भोसले महाविद्यालयाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर त्यांचे वाहन आले. तेव्हाच समोरुन संस्थेचे संचालक संदीप भोसले हे आपल्या चार चाकी वाहनाने येत होते. त्यांनी वाहन थांबवून, संदिप भोसले आपल्या 4-5 माणसांसह उतरुन हिरगोंड यांच्या वाहनाजवळ आले. त्यांनी हिरगोंड सरांना गाडीतून खाली उतरायला सांगितले. त्यांनतर तुम्ही संस्थेच्या विरोधात काम करता, आमचे काम करत नाही. आमच्या विरोधात बाहेर काहीही बोलता. असे बोलून हिरगोंड सरांच्या कानाखाली मारली. त्यानंतर प्रा. सानप आणि प्रा. जाधव गाडीतून खाली उतरुन संदीप भोसले यांना असे का करता, आपण बसुन बोलुयात असे सांगत होते. तोपर्यंत त्यांच्यासोबत असलेल्या माणसांनी लाकडी काठी, लोखंडी सळईने तिघांना मारहाण सुरू केली. प्रां. जाधव मार चुकविण्यासाठी निसर्ग हॉटेलच्या दिशेने पळून गेले. काही वेळाने प्राचार्य महेंद्र गायकवाड त्या ठिकाणी आले. त्यांच्यादेखत पुन्हा प्राध्यापकांना मारहाण सुरु केली. याचवेळी प्रा. निळकंठ भालेराव आणि प्रा. बाळासाहेब लबडे मोटरसायकलवरुन आले. प्रा. भालेराव आमची चौकशी करत असताना संदीप भोसले यांनी हा त्याचा म्होरक्या आहे. ह्याला पण घ्या असे सांगत आपल्या सहकाऱ्यांसह प्रा. भालेराव यांनाही काठी, सळईने मारहाण केली. काही वेळात संस्थेचे अध्यक्ष महेश भोसले आले. त्यांनी देखील हे प्राध्यापक हरामखोर आहेत. बाहेरचे असून आमच्या गावात येवून दादागिरी करतात. आमच्या विरुध्द लोकांना काहीही सांगतात. यांना धडा शिकवा. असे बोलून शिवगाळी व दमदाटी करु लागले. तेव्हा देखील संदीप भोसले व त्यांच्यासोबत असलेल्या 4-5 जणांनी पुन्हा मारहाण केली. त्यानंतर प्रा. सानप आणि प्रा. हिरगोंड कॉलजेच्या प्रवेशद्वाराजवळील झेंडावंदनाच्या कठड्यावर पाणी पित बसलेले असताना पुन्हा संस्थेचे अध्यक्ष महेश भोसले, सचिव संदिप भोसले आणि त्याच्यासोबत असलेली मंडळी सानप व हिरगोंड सरांजवळ आली. त्यावेळी रोहन भोसलेने शिवगाळी करत मारहाण केली. यावेळी तिथे असलेल्या भालेराव आणि हिरगोंड सरांच्या हात, पाय व पाठीवर वळ उठेल इतके मारले. KDB college professor beaten
बुधवारी (ता. 18) सकाळी 8.30 वा. घडलेल्या घटनेबाबतचा गुन्हा रात्री 10.23 वा. दाखल करण्यात आला. पोलीसांनी संस्थेचे अध्यक्ष महेश भोसले, सचिव संदिप भोसले, रोहन भोसले आणि 4-5 अनोळखी माणसांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या मारहाणीमध्ये प्रा. गोविंद सानप यांच्या डोळ्याला जबर मार लागला आहे. तर प्रा. अनिल हिरगोंड यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अधिक उपचारासाठी या दोघांना जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.
ही घटना समजताच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. जी.बी. राजे, चिपळूण, मुंबई विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या (BUCTU) राज्य उपाध्यक्षा डॉ. ज्योती पेठकर, मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य प्रा. हणमंत सुतार यांच्यासह लांजा, रत्नागिरी, चिपळूण, खेड, मंडणगड येथील प्राध्यापक गुहागरला आले. गुन्हा दाखल होईपर्यंत ही मंडळी पोलीस ठाण्यात तळ ठोकून होती. KDB college professor beaten