सामान्यजनांनी केलेले वृक्ष संवर्धन
लेखक : डाॅ.नागेश टेकाळे (सकाळ अँग्रोवन 12.3.2024 वरुन साभार )
GUHAGAR NEWS : कर्नाटकमध्ये श्रीमती धिम्माक्का या ११२ वर्षाच्या वयोवृद्ध महिला आजही हयात आहेत. स्वतःला मूल नाही म्हणून धिम्माक्काने वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला.पहाटे चार वाजता उठून दोन कोसावरून पाण्याचा हंडा आणून त्यांनी तिच्या गावाजवळून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा शेकडो वटवृक्षांना दुतर्फा रूजवून, सांभाळून मोठे केले आहे. आज या महामार्गाच्या सलग ४५ कि.मी.रस्त्यावर धिम्माक्काने रूजवलेले तब्बल ३८५ डेरेदार वटवृक्ष दुतर्फा सैनिकाप्रमाणे एका रांगेत उभे आहेत, म्हणूनच हा महामार्ग धिम्माक्काच्याच नावाने ओळखला जातो. धिम्माक्काची वृक्ष लागवडीची तहान फक्त वटवृक्षापुरतीच मर्यादित नव्हती, तिने तिच्या गावात आठ हजारापेक्षाशी जास्त वृक्ष लावले आहेत. कर्नाटकातीलच तुलसी गौडा या ८८ वर्षाच्या महिलेनेही तिच्या गावपरिसरात तब्बल ३० हजार देशी वृक्ष फक्त लावले नसून जगविलेले आहेत. २० वर्षापूर्वी भूगर्भात खोल गेलेले जल तुलसी गौडाने वृक्षांच्या सहाय्याने आज भूपृष्टापर्यत आणले आहे. Jungle Cup Tournament
राजस्थानमधील पिपलांत्री हे मार्बलच्या खाणीने वेढलेले गाव नाथद्वारापासून जेमतेम २७ कि.मी.दूर आहे. या गावात पाणी तब्बल ८०० फूट खोल गेलेले, पिण्याच्या पाण्याचे हे महासंकट म्हणून या गावात लग्नासाठी कुणी मुलीही देत नव्हते. आपल्या गावात मुली येत नाहीत म्हणून येथील गावकर्यांनी स्रीभूण हत्त्या सुरू केली. सरपंच श्याम सुंदर पालीवाल यांची कन्या किरण वयाच्या १७ व्या वर्षी पाणी पाणी म्हणत मृत्यूमुखी पडली. तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ पालीवाल यांनी गावामध्ये एक वृक्ष लावला आणि आज या गावात मुलगी जन्माला आली की तिच्या नावाने १११ वृक्ष लावण्याचे त्यांनी गावकर्यांना केलेले आवाहन त्यांच्याच सहाय्याने प्रत्यक्ष कृतीत आणले गेले आहे. आज या गावात प्रत्येक जन्मलेल्या मुलींच्या स्वागतासाठी तब्बल ३ लाख ५० हजार वृक्षांनी गर्दी केली आहे. गावचे पाणी सुद्धा भूपृष्ठापर्यत आले आहे. या गावामधील शेतकरी आता मार्बल खाणीवर कामावर न जाता ‘हरीभरी वसुंधरा’ म्हणत शेती करत आहेत. झारखंड मधील चामी मूरमू या आदिवासी महिलेने शेकडो स्रियांना एकत्रित करून मागील ३६ वर्षात ५०० गावात तब्बल २८ लाख वृक्ष लावले आहेत. धिम्माक्का, तुलसी गौडा, श्मामसुंदर पालीवाल, व चामी मूरमू हे पद्मश्रीने सन्मानित आहेत. हे सर्व पूर्वी जसे होते तसेच आजही वृक्षाप्रमाणेच विनयशील आहेत. Jungle Cup Tournament
कर्नाटक, राजस्थान, झारखंड या राज्यांनी वृक्षलागवड व संवर्धनात भरारी घेतली असताना महाराष्ट्र राज्याने मात्र मागील पाच वर्षाच्या कालावधीत, तब्बल एक लाख २८ हजार ३१४ हेक्टर जंगल केवळ वणव्यात गमावले आहे. या कालावधीत ३७ हजार ४०३ घटनांची नोंद झाली. एकीकडे वृक्ष लागवड करायची, त्याची कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यावयाची मात्र शेकडो वर्षापासून अबाधित देशी वृक्षांचे जंगल वार्यावर सोडून द्यावयाचे असेच काही तरी होत आहे. जंगलात लावलेले वृक्ष स्वतंत्र होण्याचा कालावधी कमीत कमी दहा वर्षे आणि कार्बन सामावून घेणारी त्यांची क्षमता स्थिर होण्यास तीस वर्षे आणि त्यापुढील कालावधी लागतो. तद्अनुषंगाने पाहता आज महाराष्ट्रातील जंगले सुरक्षित नाहीत हीच खरी शोकांतिका ठरली आहे. Jungle Cup Tournament
राज्यातील उद्ध्वस्त जंगलाच्या नकारात्मक पार्श्र्वभूमीवर लोकसहभागातून जंगल लागवड आणि संवर्धनाची एक जगावेगळीच कल्पना संगमनेर तालुक्यातील ५० गावामध्ये गतवर्षापासून निदर्शनास आली आहे. पंचायत समिती, संगमनेर जि.अहमदनगर, मुंबईस्थित डाॅर्फ केटल केमिकल हा उद्योग समूह, मुंबईस्थित नवदृष्टी आणि सप्रेम या सामाजिक संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने ऑक्टोबर २०२२ मध्ये मियावाकी पद्धतीने या ५० दुष्काळी गावामध्ये सरपंच आणि गावकरी यांच्याहस्ते देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. डाॅर्फ केटल कंपनीद्वारे सीएसआर अंतर्गत प्रत्येक सहभागी गावांना ४३ प्रकारच्या देशी वृक्षांची ३०० रोपे देण्यात आली. एक गुंठा जागेवर शाळकरी मुलांच्या हस्ते गावकर्यांनी गावाच्या दर्शनी भागात त्यांचे रोपण केले, वर्षभर त्यांची काळजी घेतली. प्रत्येक गावाच्या या वनात अनेक छोटे पक्षी, फुलपाखरे येतात, शाळेतील मुले तेथे अभ्यासाठी येतात, सायंकाळी वृद्धांना हक्काचे विरंगुळा स्थानही मिळाले. शासनाद्वारे होणार्या वृक्ष लागवडीपेक्षा स्थानिक लोकसहभागातून ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेवर केलेले वृक्षारोपण अधिक शाश्वत होऊ शकते, हा यामधून मिळालेला सकारात्मक संदेश प्रत्येक गावाने स्वीकारण्यायोग्य ठरला आहे. Jungle Cup Tournament
या सर्व गावांसाठी ‘डार्क केटल जंगल कप’ अर्थात ‘उत्कृष्ट जंगल कप’ निर्मितीची स्पर्धा नुकतीच घेण्यात आली होती. दुष्काळी पट्ट्यामधील स्पर्धेत सहभागी झालेल्या ५० गावांनी एकत्रित येऊन तब्बल ९५ हजार वृक्ष लावले आहेत. हा या स्पर्धेचा खरा फायदा ठरला असून त्यासाठी मियावाकी जंगल निर्मिती हे प्रेरणा स्थान ठरले आहे. संगमनेरला हजारो लोकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी उपस्थित राहून फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात प्रथमच होत असलेल्या या अनोख्या वृक्ष स्पर्धेला मनापासून आशीर्वाद दिले. या स्पर्धेत पळसखेडे, तिगाव आणि झोळे ही गावे अनुक्रमे प्रथम (एक लाख रूपये), द्वितीय(७५ हजार रूपये)व तृतीय (२५ हजार रूपये व कप) क्रमांकाचे मानकरी ठरले. त्याचबरोबर प्रत्येकी दहा हजार रूपयांची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके आणि प्रत्येक सहभागी गावास सन्मानपत्र देण्यात आले. प्रत्येक वृक्ष आम्ही आमच्या लेकराप्रमाणे सांभाळून त्यास आम्ही मोठे करणार अशी भीष्म प्रतिज्ञाच घेताना गावकरी आढळून आले. Jungle Cup Tournament