85 दिवसांत 1 हजारहून अधिक किलोमिटरचा प्रवास
मयूरेश पाटणकर, गुहागर
गुहागर, ता. 19 : फेब्रुवारी महिन्यात गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरुन 2 कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर लावून समुद्रात सोडण्यात आले होते. ही दोन्ही कासवे सध्या दक्षिण भारतातील समुद्रात आहेत. बागेश्री केरळ राज्यात पोचली आहे तर गुहा कर्नाटकातच रेंगाळले आहे. Journey of the Olive Ridley
2022 मध्ये 5 कासवांना ट्रान्समिटर लावून समुद्रात सोडण्यात आले होते. मात्र या ट्रान्समीटरद्वारे संदेश येणे बंद झाले. त्यामुळे गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या मादी कासवांचा प्रवास कसा होतो याचा पूर्ण अभ्यास करता आला नाही. म्हणून यावर्षी 22 फेब्रुवारी 2023 ला गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरुन पुन्हा दोन मादी कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर लावून समुद्रात सोडण्यात आले होते. आज 85 दिवस सातत्याने या दोन्ही कासवांकडून संदेश मिळत आहेत. 17 मे 2023 रोजी कांदळवन प्रतिष्ठानने प्रसिध्द केलेल्या नकाशाप्रमाणे बागेश्री ही मादी केरळमधील कोझीकोडे ते कोचीच्या दरम्यान कासरगोड समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 95 कि.मी. खोल समुद्रात असल्याचे निदर्शनास आले आहे. बागेश्रीचा प्रवास पहिल्यापासूनच वेगवान राहीला आहे. तर गुहा हे मादी कासव कारवार ते गोकर्णच्या दरम्यान समुद्रात आहे. गुहाचा प्रवास पहिल्यापासूनच संथ गतीने राहीला आहे. 13 एप्रिलच्या दरम्यान दोन्ही कासवे कारवार ते गोकर्णच्या दरम्यान होती. तेव्हापासून गुहा तेथील समुद्रात रेंगाळली आहे. Journey of the Olive Ridley
ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे कोकणातील किनारपट्टीवर अंडी घालुन झाल्यानंतर सुरवातीचा महिनाभर याच समुद्रात रेंगाळतात. या दरम्यान उत्तरेकडे म्हणजे गुजरातपर्यंत प्रवास करतात. साधारपणे एप्रिल महिन्यात पुन्हा या कासवांचा प्रवास दक्षिणेकडे सुरु होतो. असा निष्कर्ष दोन वर्षांच्या अभ्यासातून समोर आला आहे. Journey of the Olive Ridley
आता यापुढच्या प्रवासाचे संदेश येणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतरही ट्रान्समिटरद्वारे आपल्यापर्यंत संदेश पोचत रहातील अशी आशा आपण करुया. हे संदेश मिळाले तर पावसाळा आणि हिवाळा या दोन हंगामात या कासवांचे वास्तव्य कोणत्या परिसरात असते ते आपल्याला समजु शकणार आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय वन्यजीव संस्थेतील ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचा अभ्यास करणारे संशोधक डॉ. सुरेशकुमार यांनी दिली. Journey of the Olive Ridley