गुहागर ता. 24 : आगामी काळातील संभाव्य पर्जन्यवृष्टी आणि त्या अनुषंगाने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती या पार्श्वभूमीवर चिपळूण व गुहागर तालुक्यात १३ विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दोन तालुक्यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आगामी एका वर्षासाठी ही पथके कार्यरत राहणार असून विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Joint meeting of Chiplun, Guhagar Taluks

२२ जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टी आणि महापुरात चिपळूण शहर व परिसरात मोठी वित्त व जीवितहानी झाली. यातून बोध घेत प्रशासन सतर्क झाले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काळातही उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती काळातील नुकसान टाळण्यासाठी, नागरिकांना वेळत बचाव कार्य होण्यासाठी विशेष पाऊले उचलण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत ही बैठक बोलावली होती. संभाव्य पर्जन्यवृष्टी व त्या अनुषंगाने उद्भवणारी संभाव्य आपत्तीचा विचार करून चिपळूण उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या एक वर्षाच्या कालावधीसाठी विविध विभागांनुसार नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. Joint meeting of Chiplun, Guhagar Taluks

यामध्ये नियंत्रण कक्ष सूचना पथक, दक्षता पथक, पूर पातळी पथक, यंत्रसामग्री पथक, अन्नधान्य भोजन पथक, पाणी पुरवठा पथक, विद्युत पथक, साफसफाई आरोग्य पथक, औषधोपचार रक्त पुरवठा व रुग्णवाहिका पथक, निवारा पथक, वाहतूक पथक, दूरध्वनी व इंटरनेट सुविधा पथक, समन्वय व शिष्टाचार पथक या पथकांचा समावेश आहे. ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर जबाबदारी सोपविली आहे त्याने ती योग्य रित्या पार न पाडल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रांताधिकारी श्री. लिंगाडे यांनी दिला. या बैठकीला श्री. लिंगाडे यांनी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी तहसिलदार प्रवीण लोकरे, नायब तहसिलदार समीर देसाई, चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे तसेच विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. Joint meeting of Chiplun, Guhagar Taluks