देवघर आदर्श विद्यालयच्या विद्यार्थिनींसह १३५ मुलींना शैक्षणिक मदत
गुहागर, ता. 18 : मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, या उद्देशाने श्री दुर्गादेवी देवस्थान फंड, गुहागर यांच्या वतीने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत पंचक्रोशीतील सुमारे १३५ विद्यार्थिनींना प्रत्येकी ११०० रुपयांचा शैक्षणिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. या उपक्रमात आदर्श विद्यालय देवघर, ता. गुहागर येथील विद्यार्थिनींचाही समावेश होता. Initiative of Shri Durgadevi Devasthan
मुलींच्या शिक्षणासाठी देवस्थानच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम पंचक्रोशीत विशेष कौतुकाचा विषय ठरला आहे. या कार्यक्रमास ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके प्रमुख उपस्थित होते. तसेच श्री दुर्गादेवी फंडचे अध्यक्ष श्री. किरण खरे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आदर्श विद्यालयाचे विद्यमान चेअरमन डॉ. भाई सकपाळ व डॉ. दादा सकपाळ, पंचक्रोशीतील बहुसंख्य पालक, शिक्षक व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. Initiative of Shri Durgadevi Devasthan
यावेळी डॉ. राजेंद्र फडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, मुलींच्या सर्वांगीण विकासाची आवश्यकता आणि समाजाने मुलींच्या पाठीशी उभे राहण्याची गरज व्यक्त केली. ‘बेटी, जल आणि वन’ हा संदेश देत त्यांनी मुलींच्या शिक्षणाबरोबरच जल व वन संवर्धनाचे महत्त्वही अधोरेखित केले. एखाद्या देवस्थानच्या माध्यमातून मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आर्थिक मदत देण्याचा असा उपक्रम प्रथमच पाहायला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित पालक व नागरिकांनी व्यक्त केल्या. Initiative of Shri Durgadevi Devasthan
दुर्गादेवी देवस्थान फंडच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वांनी कौतुक करून पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. देवस्थानच्या माध्यमातून भविष्यातही अशाच प्रकारचे शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जावेत, अशी सदिच्छा उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास आदर्श विद्यालय देवघरचे मुख्याध्यापक श्री. राऊत सर तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता. मुलींच्या शिक्षणाला आर्थिक आधार देणाऱ्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतून सर्वत्र कौतुक होत आहे. Initiative of Shri Durgadevi Devasthan
