गुहागर, ता. 25 : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने दि. ५, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सव संपन्न होणार आहे. याच्या शुभारंभी दि. ५ रोजी शहरातून पवन तलाव येथून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. तसेच श्रीजुना कालभैरव मंदिर ट्रस्ट अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात हा महोत्सव होणार आहे. Inauguration Procession of Konkani Food Festival
ही शोभायात्रा ५ रोजी सकाळी ७.३० वाजता पवन तलाव मैदानातून सुरू होईल. पुढे ती नगरपरिषदेकडून शिवनदीमार्गे वडनाक्यातून जुना कालभैरव देवस्थान अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात महोत्सवस्थळी पोहोचेल. या शोभायात्रेत शहर परिसरातील सुमारे बारा हायस्कूल, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, शहरातील विविध मंडळे, लोककलाकार पारंपारिक वेषात विविध मुखवटे, डेरा, वारकरी, ढोलपथके, मैदानी खेळ आदींसाठी सुमारे पंधरा गावातील लोककलाकार सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे या शोभायात्रेत पराग ओक यांचा वराह अवतार, खेड तालुक्यातील सात्विक- आयणी गावचे टिपरी नृत्य, शिरगावमधील श्री व सौ मनोहर धागडे हे वारकरी संप्रदायाचे सर्वात उंच जोडपे, संदीप जाधव विविध मुखवटे, कामथे येथील ठसाळे यांचा डेरा, ओमळी येथील गोंधळी, सावर्डे आर्ट कॉलेज येथील बारा बलुतेदार कलाकार, उंदीर, घोडा, रेडा, रावण, संकासूर, नटवा, गणपती, कोबडा, नमन, भारूड, मंगळागौरी, फुगड्या, मैदानी खेळ, ढोलपथके आदी शोभायात्रेची भव्यता वाढवणार आहेत. Inauguration Procession of Konkani Food Festival
पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सवाच्या शुभारंभी ५ रोजी शहरातून पवन तलाव येथून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन लोककला महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन शोभायात्रा विभागप्रमुख शिवाजी शिंदे, समीर शेट्ये यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 8788500656 येथे संपर्क साधावा. Inauguration Procession of Konkani Food Festival