उपाययोजना करण्याबाबत डाँ. नातू यांचे मुख्य वनसंरक्षकांना पत्र
गुहागर, ता. 25 : गुहागर व चिपळूण तालुक्यातील वन्य प्राण्यांकडून होत असणाऱ्या नुकसानीमध्ये गवा प्राण्याने केलेल्या नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. याकरिता शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याकरिता काही आराखडा तयार करून वन विभागामार्फत सदर आराखड्याची अंमलबजावणी करावी व शेतकऱ्यांना त्यांच्या बागायतीला होणाऱ्या त्रासापासून संरक्षण मिळणेबाबत योग्य ती उपाययोजना आपल्या स्तरावर करावी, अशी मागणी माजी आ. डाँ. विनय नातू यांनी नागपूर येथील वन्यजीव मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. Horticultural damage caused by animals


या पत्रात म्हटले आहे की, गुहागर तालुक्यातील झोंबडी गावामध्ये गट नंबर १८४४, १८४६, १८४८ मध्ये आंबा व काजूची बाग आहे. या आंबा कलमांच्या बागेमध्ये गवा प्राणी शिरून आंब्याची कच्ची फळे खाणे, आंबा झाडाला घासून आंबे पाडून आंबा बागेची नुकसान करीत आहेत. या भागातील गवा प्राणी कळपाने सुपारी, काजू, आंबा या सर्व बागायती क्षेत्रांमध्ये येत असून, बागायती क्षेत्रातील झाडांची मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. या सर्व नुकसानीचे प्रमाण फार मोठे आहे. बागायतीचे होणारे नुकसान आर्थिक मदतीने न भरून येणारे आहे. कारण, बागायत क्षेत्र निर्माण करण्याकरिता शेतकऱ्याला अनेक वर्ष कष्ट करावे लागतात. दिवसेंदिवस गवा प्राण्याचा त्रास गुहागर व चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढत आहे. यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, असे पत्रात नमूद केले आहे. Horticultural damage caused by animals