भावनेच्या आहारी जाऊन निराश होऊ नका
श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
मित्रांनो आपण सर्वजण भावनाप्रधान असतो. एखादी चांगली गोष्ट केली आणि दुसऱ्याने त्या गोष्टी करता आपल्याला नावाजले तर आपल्याला छान वाटते. तुम्ही एखादा छान ड्रेस किंवा साडी नेसली की तुम्हाला वाटत असते की घरातील इतरांनी किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींनी तुम्हाला ऍप्रिसिएट करावे. त्याला चांगली प्रतिक्रिया द्यावी, आणि तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला की तुम्हाला छान वाटतं आणि समजा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, कोणीच त्या गोष्टीचं कौतुक केलं नाही, तर तुम्ही लगेच नाराज होऊन जाता. ही सर्व तुम्ही खूप भावनाप्रधान आहात याची लक्षणे आहेत. माणसाने भावनाप्रधान असायलाच हवं. पण कधी कधी आपण भावनेच्या एवढे आहारी जातो की त्यातून बऱ्याच वेळा नैराश्य देखील येऊ शकते.
उदाहरणार्थ: आपण घातलेला नवीन ड्रेस किंवा साडी बद्दल कोणी काहीच प्रतिक्रिया दिलेली नसेल, तर बऱ्याच वेळा आपण तो ड्रेस किंवा साडी पुन्हा घालत नाही किंवा फार कमी घालतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी नकारात्मक भावना करून घेतो. एवढेच काय ज्या ज्या वेळी तुम्ही तो ड्रेस किंवा साडी घालता, त्या त्या वेळेला तुम्हाला डाऊनच वाटेल, तुम्हाला आनंद होणार नाही. Happy Life part – 6
तुमच्या नवऱ्याने किंवा बायकोने एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी केली नसेल, रागामध्ये एखादा अपशब्द बोलला असेल, तर त्यावेळी देखील आपण नाराज होऊन जातो. ‘मी दिसायला चांगली नाही. मी या गोष्टीला लायक नाही. मी असाच आहे.’ अशा प्रकारचे स्वतःला कमी लेखणारे विचार आपल्या मनात येतात. तसेच समोरच्या व्यक्तीबद्दल थोडासा आदर कमी होतो. त्यामुळे त्या नात्यांमध्ये प्रेम देखील राहत नाही.
तुम्ही सांगितलेली एखादी गोष्ट तुमच्या मुलीने किंवा मुलाने केली नाही तर तुम्हाला असं वाटू शकतं की ही मुलं काही कामाची नाहीत, आपलं कोणी ऐकतच नाही.
मित्रांनो, अशी अनेक उदाहरणे तुम्हाला देता येतील. मला सांगायचे एवढेच आहे की तुम्ही सांगितलेली एखादी गोष्ट तुमच्या मुलांनी, तुमच्या पार्टनरने ऐकली नाही, तर त्याच्यावर जास्त वेळ विचार करू नका. जर ती गोष्ट सोडून देता येत असेल तर सोडून द्या. जर ती गोष्ट करणे खूपच महत्त्वाचे असेल तर प्रेमाने त्यांच्या मदतीने ती गोष्ट तुम्ही पूर्ण करा. Happy Life part – 6
परंतु सतत चिडचिड करत बसू नका किंवा स्वतःला कमी लेखू नका. तुम्हाला जेवढे जमते तेवढे तुम्ही आनंदाने करत चला. परंतु जास्त इमोशनल होऊ नका. तुमचा मूड चेंज करण्यासाठी तुम्हाला आवडणाऱं संगीत ऐका किंवा स्वतःला प्रोत्साहित करणारी एखादी कृती करा. आता तुम्ही स्वतःमध्ये छान बदल करायला सुरुवात केली असेल. कदाचित यावरून देखील तुमच्या घरामध्ये तुम्हाला चिडवत असतील. परंतु काही काळजी करू नका. इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही इतरांविषयीच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडूनच तुम्हाला वेळ देत आहात, त्यामुळे काही काळजी करू नका.
ज्यांच्याकडून आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. स्वतःची कामे स्वतःच करायचा प्रयत्न करा, जास्त दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. तुम्ही चांगले असण्यासाठी तुमच्या भावना चांगल्या असल्या पाहिजेत. तुमच्या भावना चांगल्या असण्यासाठी तुमचे विचार चांगले असले पाहिजेत. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार केल्यामुळे चांगल्या भावना निर्माण होतील व तशा प्रकारची कृती तुमच्या हातून होईल.
कुठल्याही गोष्टी जास्त मनाला लावून घेऊ नका. तुम्ही स्वतःला सांगा की ‘मी खूप छान व्यक्ती आहे. मी एक असामान्य व्यक्ती आहे.’ मित्रांनो तुम्ही सकारात्मक विचार करता म्हणून, तुम्ही खूप चांगले आहात म्हणूनच तुम्ही या ग्रुप मध्ये आलेला आहात. म्हणून आज पासून नकारात्मक गोष्टींचा जास्त विचार न करता काम करत चला आणि जास्त भावनांच्या आहारी जाऊन निराश होऊ नका. Happy Life part – 6
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -7 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद
तुमच्या पुढील उज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप प्रेम व शुभेच्छा