श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
मित्रांनो तुम्ही आतापर्यंत दुसऱ्यांची जास्त काळजी करत आला आहात. पती-पत्नी, मुलगा मुलगी, आई वडील, मित्र-मैत्रिणी व अशी अनेक इतर नाती यांची तुम्ही काळजी घेत असता. त्यांच्यावर आपण प्रेम करत असतो.
एखादी गोष्ट आपल्या पार्टनरला आवडत नाही, मग ती करायची नाही. एखादा पदार्थ सासू सासऱ्यांना, मुलांना आवडत नाही. मग त्यांच्या आवडीचा पदार्थ करायचा. बायकोला अमुक रंग आवडत नाही, तिच्या आवडीच्या रंगाची साडी घ्यायची. मी जर वेळेवर पोहोचले नाही तर आपला मित्र किंवा मैत्रीण काय म्हणेल? नोकरीमध्ये आपल्या बॉसच्या मनासारखं वागायचं. प्रवासामध्ये इतर प्रवाशांना त्रास होऊ नये असं वागायचं. शेजाऱ्यांना त्रास होईल असं काहीच करायचं नाही. मुक्या प्राण्यांवर प्रेम करायचं. घरात पाळलेल्या डॉगी ला शिळी भाकरी नको, मग त्याच्यासाठी ताजी पोळी करायची. अशा किती गोष्टी सांगू..
आपण इतरांच्या वर जास्त प्रेम करतो. अर्थातच आपण प्रेम करतो, त्यावेळी त्यांनी देखील आपल्या वर तसंच आणि तितकंच प्रेम करावे ही अपेक्षा देखील करतो आणि ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तर पुन्हा दुःख. आणि नैराश्य.
मित्रांनो आज तुम्हाला मी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे स्वतःवर प्रेम करा. (Self Love) स्वतःसाठी वेळ द्या.
तुमची सर्व स्वप्नं तुम्हीच ठरवता.. ती पूर्ण करण्यासाठी तुम्हीच प्रयत्न करता… परंतु ती स्वप्ने पूर्ण झाली नाहीत तर तुम्ही दुःखी होता, नैराश्यात जाता.. तुम्हाला जे हवं आहे ते न मिळाल्यामुळे तुम्ही इतरांना दोष देऊ लागता..तुमची परिस्थिती, तुमचे नातेवाईक इतकंच काय आपण देवाला आणि शेवटी आपल्या नशिबाला देखील दोष देत असतो..
जरा विचार करा, तुम्हाला आनंद मिळावा म्हणून तुम्ही स्वप्ने बघता. आणि म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात. त्यामुळे स्वतःमध्ये बदल घडवणे आवश्यक आहे. त्यातला महत्त्वाचा बदल आजपासून हा करायचा आहे की स्वतःवर खूप प्रेम करायचं आहे. स्वतःला वेळ द्या. तुमचं शरीर तुमच्याशी नेहमी बोलत असतं, परंतु ते ऐकायला तुमच्याकडे वेळच नसतो. थोडसं ऐकायला चालू करा, मग तुम्हाला कळेल की तुम्हाला काय खायला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, स्वतःचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगलं ठेवायला पाहिजे. आणि हे सर्व चांगलं असेल तर तुम्हाला आनंद मिळतो. एखादं स्वप्न आज पूर्ण नाही झालं तरी चालेल, ते नंतर कधीतरी होईल. काही काळजी करू नका.
तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागला की तुम्हाला त्यातून आनंद व समाधान मिळेल. स्वतःवर प्रेम करायला लागला की ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये बदल होईल. तुमच्या कपड्यांमध्ये, तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये, तुमच्या आहारामध्ये, तुमच्या दैनंदिन सवयी मध्ये. आणि तो चांगला बदल घरातील इतर मंडळी देखील अनुभवतील, बघतील आणि नकळतपणे ते तुमच्या प्रेमात पडायला लागतील. आज पर्यंत तुमच्यावर इतरांनी प्रेम करावे, तुम्हाला वेळ द्यावा, तुम्हाला चांगलं म्हणावं म्हणून तुम्ही किती प्रयत्न केलेत. परंतु त्याचा फायदा तितकासा झाला नाही, हे सत्य आहे. पण ज्या क्षणाला तुम्ही स्वतः मध्ये बदल घडवता, त्या क्षणापासून घरातीलच काय तर इतर सर्व मित्र-मैत्रिणी, तुमच्या ऑफिसमधले सर्व लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतील, तुम्हाला मदत करायला तयार होतील, तुमचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करायला लागतील. आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कशी बहार येते ते…
मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही मनाने आणि शरीराने चांगले असाल तरच तुम्ही प्रत्येक यशाचा आनंद घेऊ शकाल. गाडी घेतली तर गाडीने फिरू शकाल. कुठे फिरायला जायचे असेल तर, तुम्ही फिरायला जाऊ शकाल. चांगले कपडे घेतले तर, तुम्ही घालू शकाल. चांगले पदार्थ केले तर ते खाऊ शकाल. तुमच्याकडे पैसा भरपूर आला तर त्या पैशाचं योग्य वापर करून तुम्हाला हव्या त्या गरजा पूर्ण करू शकाल व तुमच्या जीवनाचा आनंद घेऊ शकाल. पण जर तुम्हीच व्यवस्थित नसाल तर या सर्व गोष्टी मिळून देखील तुम्हाला त्याचा काहीही लाभ तुम्ही घेऊ शकणार नाही. म्हणून स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःवर खूप प्रेम करा. स्वतःवर कसे प्रेम करायचे यासंबंधी तुम्हाला अधिक मार्गदर्शन हवे असल्यास कृपया मला तसे कळवा, त्यावर देखील मी नक्की मार्गदर्शन करीन.
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग भाग -1 वाचण्यासाठी क्लिक करा.
धन्यवाद
तुमच्या पुढील उज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप प्रेम व शुभेच्छा