प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया नको
श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
मित्रांनो बऱ्याच वेळा आपण बघतो की कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपल्यात मतभेद होतात, वाद होतात किंवा त्याच्या रूपांतर भांडणांमध्ये देखील होत असतं. जर तुम्ही नीट निरीक्षण केले तर तुम्हाला असे आढळेल की भांडणाचं मुख्य कारण एकदम शुल्लक होतं. परंतु त्यानंतर ज्या क्रिया-प्रतिक्रिया झाल्या त्याच्यामुळे भांडण लागलं.
उदाहरण१: भाजी मध्ये मीठ कमी पडले ही घटना आहे. नवऱ्याने बायकोला सांगितले की “आज भाजीत मीठ कमी आहे”. त्यावर बायकोने जर ते मान्य करून स्माईल करून थोडेसे मीठ वाढले तर वाद वाढणार नाही. परंतु मीठ कमी आहे असं म्हटल्यावर नवऱ्याला “बाहेर कसलंही असलं तरी तुम्ही खाता, परंतु घरामध्ये जरा मीठ कमी पडले की लगेच आरडाओरडा करता. तुमच्या जिभेचे चोचले झालेत” असे म्हणून, हातवारे करून, भांडं आपटून जर मीठ वाढले तर नवऱ्याची प्रतिक्रिया काय असेल? या तिच्या प्रतिक्रियेवर नवरा म्हणतो “तुझ्या आईने तुला स्वयंपाक करायला नीट शिकवलंच नाही. त्यामुळे जेवण बेचव होतंय.” त्यावर बायको म्हणते “माझ्या आईने मला स्वयंपाक कसा करायचा ते शिकवलं नाही व तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला कसे वागायचं, कसं बोलायचं ते शिकवलं नाही” असं करत करत ते भांडण आई-वडिलांचा उद्धार करण्यापर्यंत पोहोचतं.
मला सांगा मुख्य विषय राहिला बाजूलाच आणि एका क्रियेवर दुसऱ्याची प्रतिक्रिया चालू झाली आणि म्हणून भांडण वाढलं. जर पहिल्या प्रतिक्रियेला दुसऱ्याने छान प्रतिसाद दिला असता तर गोष्ट एवढी पुढे गेलीच नसती.
उदाहरण २: एकदा दुसरीत शिकणाऱ्या एका मुलाने आईकडे नवीन खेळणे घेण्याचा हट्ट धरला. ही मुख्य घटना. आईने त्या मुलाला जवळ घेतलं व त्याला सांगितलं की आत्ताच पंधरा दिवसांपूर्वी तुझा बर्थडे झाला, त्यावेळी पप्पांनी तुला दोन चांगली खेळणी आणलेली आहेत. आता लगेच आपल्याला नवीन खेळणं घेण्याकरता पैसे नाहीयेत. पैसे आले की तुला आपण अजून एक खेळणं घेऊया. मुलाला विश्वासात घेऊन, त्याला जवळ घेऊन आईने सांगितलेली ही गोष्ट त्याला पटली. व त्याने खेळण्याचा हट्ट सोडला.
नंतर एक दिवस त्या मुलाच्या शाळेमध्ये शिक्षकांनी त्याला शिवाजी महाराजांचा रोल करण्यासाठी, कपडे भाड्याने आणण्यास सांगितले. परंतु त्या दुसरीतल्या मुलाने टीचर ना सांगितले की “मला शिवाजी महाराजांचा रोल नाही करायचा, मी मावळा होईन.” टीचर ना काहीच कळेना, तो असे का बोलतोय ते. त्यांनी त्या मुलाच्या आई-वडिलांना शाळेत बोलावले व शिवाजी महाराजांचा रोल न करण्याचे कारण विचारले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या आई-वडिलांना याची काहीच कल्पना नव्हती. आईनेच मुलाला विचारलं की “तू का तो रोल करत नाहीस..” तेव्हा तो मुलगा म्हणाला,” आई तूच मला सांगितले होतेस की, माझ्या बर्थडे साठी पप्पांनी मला गिफ्ट आणले होते. व त्यांच्याकडचे पैसे संपले होते. महाराजांचा रोल करायचा म्हणजे त्या ड्रेसला पैसे लागतील. मला माहीत होते की पप्पांच्या कडे पैसे नाहीत व मावळा होण्यासाठी जास्त काही पैसे लागत नाही. कोणत्याही कपड्यावर आईची ओढणी घेतली तरी मावळा बनता येते. म्हणून मी शिवाजी महाराजांचा रोल करण्यास नकार दिला..”
मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकानं एकमेकांना चांगला प्रतिसाद दिला, म्हणून त्यांच्यात कुठेही भांडण झाले नाही. उलट त्यांच्यातले बॉंडींग अजून वाढले. त्या एकमेकांच्या मनात आदर व प्रेम वाढले. याच्या उलट मुलाने पुन्हा खेळणी मागितल्यावर आईने त्याला मारले असते, तर आई विषयी त्याच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाली असती. फक्त छान प्रतिसादामुळे तसे झाले नाही !
मित्रांनो अशा अनेक घटना सांगता येतील की ज्या ठिकाणी आपण छानसा रिस्पॉन्स देऊन, प्रतिसाद देऊन आपली कामे करू शकतो, परंतु आपण प्रत्येक गोष्टीवर लगेच रिऍक्ट होतो. आपल्याकडून नकारात्मक प्रतिक्रिया किंवा कृती होत असते.
मुळात रिस्पॉन्स आणि रिऍक्शन या दोन वेगवेगळ्या भावना आहेत, हे समजून घ्या.
डॉक्टर पेशंटला विचारताना पेशंटचा रिस्पॉन्स कसा आहे, औषधांची काही रिएक्शन तर नाही ना? असे विचारत असतात.
एखादा नवीन व्यवसाय चालू केल्यावर आपण सहज विचारतो ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे?
दंगल झाली, दगडफेक झाली तर त्यावेळी आपण म्हणतो ही त्या माणसांची प्रतिक्रिया आहे.
म्हणजे रिस्पॉन्स आणि रिएक्शन, प्रतिसाद आणि प्रतिक्रिया या एकमेकांविरोधी आहेत.
काही घटना बघा:
आपला मित्र किंवा मैत्रिण दिलेल्या वेळेपेक्षा उशीरा आली.
एखाद्या दिवशी बायकोने तुम्हाला डबा दिला नाही.
एखाद्या ग्राहकाने तुमच्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिली.
भाजीवाल्या मावशीने आज भाजी महाग दिली.
तुमचे महत्त्वाचे काम चालू असताना लाईट गेली.
तुम्ही बाहेर फिरायला जात असताना अचानक पाहुणे आले.
तुमच्या लहान बाळाने तुम्हाला झोपू दिलं नाही.
कामावर जाताना ट्रेनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला.
तुम्ही मिटींगला जात असताना अचानक तुमची गाडी बंद पडली.
परीक्षेमध्ये तुमच्या मुलांना अपेक्षित मार्क्स नाही मिळाले.
व्हाट्सअप वर तुम्ही सांगितलेल्या जोक ला कोणीच हसले नाही.
अशा प्रकारच्या कितीतरी छोट्या मोठ्या घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. या अशा घटनांमधून आपल्याला राग, द्वेष, चीड, असमाधान मिळणार की प्रेम, शांती, समाधान मिळणार हे तुमची ॲक्शन ठरवणार आहे.
मला खात्री आहे की इथून पुढे तुम्ही प्रत्येक गोष्टीला छान रिस्पॉन्स द्याल आणि तुम्ही आनंदी व समाधानी जीवन जगत असाल.
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -15 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद,
तुम्हाला खूप खूप प्रेम व शुभेच्छा