लहान मुलांसारखे आनंदी रहा
श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
मित्रांनो, आज मी तुम्हाला लहान मुलासारखे वागायला सांगणार आहे. लहान मुलाच्या (बाळाच्या) एकेक कॉलिटीज आपण बघूया.
बाळाच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. त्याला काही दुखत असेल, त्याला भूक लागली असेल, तर ते रडते. कारण त्याला काहीतरी होतंय, काहीतरी दुखतंय, काहीतरी पाहिजे आहे हे सांगण्यासाठी त्याच्याकडे शब्द नसतात, त्याला बोलता येत नाही व म्हणून रडण्यातून ते त्याच्या आईला त्या गोष्टी सांगत असते.
लहान बाळ हळूहळू मोठे होत जाते, तसे त्याला अनेक प्रश्न पडू लागतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ते त्याच्या आईला, पप्पांना किंवा घरातील इतर मोठ्या मंडळींना सतत प्रश्न विचारत असते. लहान मुलं सतत ऍक्टिव्ह राहतात. उठल्यानंतर झोपेपर्यंत सतत ते उड्या मारत असतात, डान्स करत असतात, दिवसभर खेळत असतात. त्यामुळे लहान मुले नेहमी खूप एनर्जेटिक असतात
त्यांना कोणी रागावले किंवा त्यांना काही लागले, खरचटले तर तेवढ्यापुरतीच ही मुले रडतात, व नंतर लगेच हे दुःख विसरून पुन्हा त्यांच्या खेळण्यात मग्न होतात. काही मुले रडतात आणि आपण ‘स्माईल’ म्हटले की लगेच स्माईल देखील देतात. हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवले देखील असेल. त्यांना कंटाळा आल्यावर, ते लगेच झोपी जातात. तुम्ही त्यावेळी त्यांना कितीही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला किंवा खेळायला दिले, तरी ते खेळत नाहीत, ते झोपून जाणे पसंत करतात.
त्यांच्या मनात इतर लोकांच्या बद्दल कोणताही आकस नसतो. त्यांचा प्रत्येकावर विश्वास असतो. तुम्ही तुमच्या बाळाला हवेमध्ये झोकून त्याला झेलत असता, तरी देखील ते रडत नाही, भीत नाही, कारण त्यांचा तुमच्यावर विश्वास असतो. त्याला माहित असते की त्याचे मम्मी, पप्पा त्याला खाली पडून देणार नाहीत. इतकेच काय, बिनधास्तपणे ती कुत्र्याच्या तोंडात हात घालतील, त्याच्या पाठीवर बसतील, मांजराची शेपटी ओढतील. व आश्चर्य म्हणजे हे मुके प्राणी सुद्धा त्यांना काही इजा करत नाहीत.
लहान मुलांची अजून एक चांगली सवय असते की ते मोठ्या माणसांचं ऐकतात व त्यांना आदर व प्रेम देत असतात. लहान मुलांची अजून एक सवय असते. ते त्याच्या आई-वडिलांचे, मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात.
मित्रांनो, आपण सर्वजण देखील लहान असताना असेच होतो. एकदम एनर्जेटिक, उत्साही, न घाबरणारे, मोठ्यांचं अनुकरण करणारे, स्वच्छंदी व मजा मस्ती करणारे. परंतु जसजसे आपण मोठे होत गेलो, तसतसे आपल्याला अनेक चांगल्या वाईट गोष्टींचे ज्ञान होऊ लागले. आपल्या मनामध्ये अनेक नकारात्मक समज पक्के होत गेले. अनेक नकारात्मक भावना निर्माण झाल्या. एखादी व्यक्ती चांगली किंवा वाईट असे विचार निर्माण केले गेले.
त्यामुळे आता आपल्याला शांत झोप येत नाही. आपण आपल्याला पाहिजे तसं वागू शकत नाही, आनंद व्यक्त करू शकत नाही, आनंदाने उड्या मारू शकत नाही. काहीही करताना एक विचार मनात येतो ‘लोक काय म्हणतील?’ मित्रांनो लहान असताना असा विचार आपल्या मनात येत होता का? अजिबात नाही, त्यामुळे आपण स्वच्छंदी होतो, आनंदी होतो.
आता आपल्याकडून चूक झाली तर आपण सॉरी म्हणताना देखील दहा वेळा विचार करतो. दुसऱ्याची चूक झाली तर मात्र आपला इगो हर्ट होतो आणि त्याच्याकडून आपण सॉरी ची अपेक्षा करतो.
लहानपणी तसं नव्हतं, चूक झाली की मोठी माणसं सांगायची की “सॉरी बोल”. लगेच आपण सॉरी बोलून मोकळे व्हायचो. दुसऱ्याने सॉरी म्हणायची वाट कधी बघितली नाही. त्यामुळे कुणाबद्दल राग, द्वेष कधी मनात राहिलाच नाही. लहानपणी एकमेकांच्या चुका माफ करून लगेच विसरून देखील जायचो. आता दहा दहा, वीस वीस वर्षे झाली तरी देखील आपण त्या जुन्या नकारात्मक आठवणी पुन्हा पुन्हा उगाळत बसतो. व स्वतः दुःखी होतो. इतरांच्या बद्दल नकारात्मक भावना मनात ठेवून आपण आपले नातेसंबंध खराब केलेत.
आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल , स्वतःला काही त्रास होत असेल तरी देखील आपण एकमेकांना सांगत नाही. प्रत्येक वेळी मन मारून आपण बसत असतो. मित्रांनो एकमेकांशी बोला, गप्पा मारा. दररोज तुमच्या घरातील व्यक्तींशी तुमच्या मित्रांशी तुमचा संवाद होऊ द्या.
तुमच्या मुलांना जवळ घ्या. आपण एवढे शिस्तीत वागायला लागलो की आई वडिलांना मिठी मारू शकत नाही, त्यांना hug करू शकत नाही. तुमच्या आई-वडिलांच्या जवळ थोडा वेळ बसत चला. तुमच्या जोडीदाराला वेळ द्या. जोडीदाराला, मुलांना Love You बोला. एकमेकांना प्रेम द्या
तुम्ही थकलेला असता तेव्हा तुमचं शरीर तुम्हाला थांबायला सांगत असतं. आराम करा. पूर्ण झोप घ्या. दररोज मेडिटेशन, योगा, व्यायाम करा. त्याने तुमचे मन आणि शरीर दोन्हीही चांगले राहील. तुमचा चेहरा नेहमी हसरा ठेवा. तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्हालाच नाही, तर इतरांनांही आनंद देऊन जाते.
मित्रांनो पुन्हा एकदा की लहानपण अनुभवायला चालू करा. तुमच्या जीवनात आनंद, उत्साह, प्रेम, यश नेहमी तुमच्या सोबत असेल.
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -12 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद
तुमच्या पुढील उज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप प्रेम व शुभेच्छा