3 दिवसांत 93 व्यक्तींकडून 29 हजार 500 रुपयांची दंड वसुली
गुहागर, ता. 5 : कोरोना महामारीच्या संकटात रत्नागिरी जिल्हा धोक्याच्या क्षेत्रात समाविष्ट आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 2 जून मध्यरात्रीपासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले. या कालावधीत पोलीसांना ॲक्शन मोडमध्ये येवून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिल्या. त्याप्रमाणे गुहागर पोलीसांनी ३ दिवसांत 93 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत 29 हजार 500 रुपयांची दंड वसुली केली आहे. 3 जूनला म्हणजे कडक निर्बंधाच्या पहिल्या दिवशी पोलीसांनी 64 जणांवर कारवाई करुन 23 हजार 100 रु. दंड वसुल केला. यामध्ये मोटार वाहन कायद्याप्रमाणे 43 लोकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 10 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आरटीपीसीआर तपासणी न करता सेवा पुरविणाऱ्या 4 लोकांवर प्रत्येकी 1 हजार रुपयांप्रमाणे 4 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई पोलीसांनी केली. तर मास्क न लावता फिरणाऱ्या 17 लोकांकडून 500 रुपयांप्रमाणे 8500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. कडक निर्बंधांच्या दुसऱ्या दिवशी 4 जूनला देखील तालुक्यात विनाकारण फिरणाऱ्या 14 लोकांवर पोलीसांनी कारवाई केली. त्यामध्ये 13 लोकांवर मोटर वाहन अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली. त्यातून 2900 रुपयांची दंड वसुली पोलीसांनी केली. तर 1 व्यक्तीकडून मास्क नसल्याबद्दल 500 रुपयांची दंडात्मक कारवाई पोलीसांनी केली. शनिवार, 5 जूनला संचारबंदी मोडून फिरणाऱ्या 15 जणांवर मोटर वाहन अधिनियमाप्रमाणे कारवाई करुन 3 हजार रुपयांचा दंड पोलीसांनी वसुल केला.