हिशोबामध्ये अनियमितता तरीही तीन वर्ष संस्था ब वर्गात
मयूरेश पाटणकर, गुहागर
गुहागर, ता. 04 : गुहागर तालुका खरेदी विक्री संघांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. एकही रेशन दुकानातून फायदा नाही. बेशिस्त पध्दतीने केलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे कर्मचाऱ्यांना वेतन द्यायला निधी नाही. खत पुरवठ्यामध्ये गोंधळ. अशा विविध कारणांमुळे खरेदी विक्रीसंघाची आर्थिक घडी कोलमडली असूनही गेली तीन वर्ष या संस्थेला लेखा परिक्षण अहवालात ब वर्ग मिळत आहे. Guhagar buying and selling team at a loss
कोणत्याही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे किंवा खासगी परवानाधारकांचे रेशन दुकान तोट्यात जात नाही. मात्र गुहागर तालुका खरेदी विक्री संघाची आठही दुकाने तोट्यात असल्याचे समोर आले आहे. रेशन दुकानातील धान्य परस्पर विकले जाते. परंतु तक्रार होत नसल्याने त्याचा बोभाटा होत नाही. शेतकऱ्यांकडून हमीभावाने भात खरेदी करण्याचा उद्योगही खरेदी विक्री संघ प्रभावीपणे राबवतो. दरवर्षी खरेदी विक्री संघात भात देण्याऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु या व्यवहारात शासनाच्या व्यवस्थेतून खरेदी केलेले भात वेळवर उचलले जात नाही. खरेदी विक्री संघाला मिळणारे कमिशन वेळेवर मिळत नाही. दरम्यानच्या काळात गोडावूनमध्ये साठवलेले धान्य उंदिर पळवतात. त्यामुळे व्यवहार वाढला तरी संघ घाट्यात अशी स्थिती आहे. गेल्या काही वर्षात खत पुरवठ्याचा व्यवसायही ढेपाळला. कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी संघाने कॅश क्रेडीट कर्ज घेतले. कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीची खातीच नाहीत मात्र दरवर्षी वेतनातून कपात दाखविली जाते. भाडे, वहातुक, हमाली यांचे आकडे वास्तवदर्शी नाहीत. अशा बेशिस्तीने केलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे गुहागरचा खरेदी विक्री संघ अडचणीत सापडला आहे. Guhagar buying and selling team at a loss
काही गोष्टींची माहिती घेतल्यावर, विशिष्ट लोकांच्या फायद्याकरीता खरेदी विक्री संघातून अनियमितपणे आर्थिक व्यवहार केले जात असल्याचे समोर येत आहे. मात्र हे व्यवहार कागदोपत्री पूर्ण होत राहील्याने त्याबाबत तत्कालीन संचालक मंडळाला कधीच संशय आला नाही. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती असुनही गेली तीन वर्ष गुहागर तालुका खरेदी विक्री संघाला लेखापरिक्षण अहवालात ब वर्ग मिळत आहे. Guhagar buying and selling team at a loss
चेअरमन म्हणून पदभार स्विकारल्यानंतर येथील बेशिस्त व्यवहारांची जाणिव झाली आहे. म्हणूनच मार्च 2023 अखेरचा लेखा परिक्षण अहवाल सुस्पष्टपणे द्यावा, अशी सूचना केली आहे. शिवाय यावर्षी प्रथमच 100 टनाहून अधिक खत पुरवठा खरेदी विक्री संघातर्फे केला आहे. कोणाचीही हयगड न करता, कडक धोरण आखून खरेदी विक्री संघ सुस्थितीत आणण्याचे आव्हान स्विकारले आहे. – डॉ. अनिल जोशी, चेअरमन, खरेदी विक्री संघ Guhagar buying and selling team at a loss