आमदार जाधव, 50 हजारांच्या मताधिक्याचे लक्ष्य
गुहागर, ता. 05 : मी इथली राजकीय संस्कृती जपली असल्याने, भाजपचे मतदारही मलाच समर्थन देतील. 50 हजाराच्या मताधिक्याने मी निवडून येईन. असा विश्र्वास आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरमधील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. Guhagar assembly polls
आमदार जाधव म्हणाले की, हा मतदारसंघ 2009 पासून आजपर्यंत शांत ठेवण्यात मी यशस्वी झालो आहे. इथली संस्कृती मी जपली आहे. त्यामुळे भविष्यातही जाधव त्रास देणार नाहीत याची खात्री भाजपला आहे. आज इथे भाजपचा उमेदवार नसल्याने भाजपचे मतदार मला समर्थन देतील हा मला विश्र्वास आहे. मनसेने लोकसभेला महायुतीला साथ दिली होती. स्वाभाविकपणे त्याचा फायदा मला होईल. मतदारसंघात मोठी सभा होणार नाही. महेश नाटेकर, विक्रांत जाधव, सचिन बाईत, नेत्रा ठाकूर, पांडुरंग कापले अशा मुख्य कार्यकर्त्यांसोबत युवासेना, अन्य घटक पक्ष प्रचार करतील. शेवटच्या टप्प्यात वेळ मिळाला तर काही सभा मी स्वत: घेणार आहे. यावेळी परगावी असलेले मतदारही गावात येवून मला मतदान करतील. 50 हजारांच्या मताधिक्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले तर मी योग्य जागी तुम्हाला दिसेन. असे आमदार जाधव यांनी सांगितले. Guhagar assembly polls
विकासाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की पर्यटन विकासावर काम सुरु आहे. रद्द झालेली एमआयडीसी पुन्हा आणायची आहे. गुहागरच्या वेशीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभे करण्याची माझी इच्छा आहे. साखरी आगर जेटीचे काम अधिकाऱ्यांच्या नकारघंटेमुळे रखडले आहे. आता सीआरझेडची सुध्दा परवानगी मिळाल्याने काम पुन्हा सुरु होईल. मोडकाआगर धरणातून धोपाव्यापर्यंत पाणी पोचविण्याचे काम तांत्रिक कारणांमुळे लांबले होते. मात्र आता ते विषयही मार्गी लागले आहेत. आरजीपीपीएल मधील विज महाग असल्याने, देशातील गॅस उपलब्ध नसल्याने, प्रदुषणविरहीत प्रकल्प आज अडचणीत असला तरी बंद पडणार नाही. निरामय रुग्णालय सुरु होण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केला. मात्र उर्जामंत्री बदलल्याने तो प्रकल्प सुरु होणे राहून गेले आहे. येत्या 5 वर्षात टोकाचे प्रयत्न करुन हे रुग्णालय सुरु करु. असे आमदार जाधव यांनी सांगितले. Guhagar assembly polls
व्हायरल व्हिडिओचे विरोधकांकडून भांडवल
सोमवारी दोन जातींची अवहेलना आमदार जाधव करत असल्याचा व्हिडिओ विरोधकांनी व्हायरल केला. याचे स्पष्टीकरण देताना आमदार जाधव म्हणाले की, मी आजतागायत कोणत्याही जातीधर्माची अवहेलना केलेली नाही. एका बैठकीत वेगवेगळ्या गावांच्या प्रथा परंपरांविषयी गप्पा सुरु होत्या. त्यावेळी माझ्या गावातील चार प्रमुख कोण याची माहिती मी सांगितली. त्याचे विरोधक भांडवल करीत आहेत. अर्थात इतक्या निवडणुका मी लढलो असल्याने या व्हायरल व्हिडिओकडे मी गांभिर्याने पहात नाही. आजवर कोणत्याही जातीधर्माची अवहेलना मी केलेली नसल्याने त्याचा मतदानावर कोणताही फरक पडणार नाही. Guhagar assembly polls