आचारसहिता लागू ; 1166 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक
गुहागर, ता. 08 : ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला मतदान होईल. यात गुहागर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचे निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. Gram Panchayat Elections
राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील एक हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आला. गुहागर तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर, चिंद्रावळे, वेळंब व परचुरी या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात मंडणगड 2, दापोली 4, खेड 7, चिपळूण 1, संगमेश्वर 3, रत्नागिरी 4, लांजा 15 व राजापूर 10 येथे निवडणूक होणार आहे. Gram Panchayat Elections
गुहागर तहसीलदार १३ सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करतील. उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुटीमुळे २४ व २५ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. याची छाननी २८ सप्टेंबरला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरला दुपारी तीनपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.मतदान १३ ऑक्टोबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल. मतमोजणी १४ ऑक्टोबरला होईल. Gram Panchayat Elections
समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा ठेवायच्या आहेत. गणेशोत्सवाची धामधूम संपत आली असतानाच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी सुरू होईल. राज्यात शिवसेनेत सुरू असलेल्या ठाकरे-शिंदे गटातील वादाचा परिणामही या निवडणुकीत दिसून येणार आहे. शिंदे गटात असलेले आमदार योगेश कदम यांच्या विधानसभा मतदारसंघात १३, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघातील 4 ग्रामपंचायतींत चुरस पाहायला मिळेल. तर ठाकरे सेनेचे आ. भास्कर जाधव, आ. राजन साळवी यांच्यासह राष्ट्रवादीचे आ. शेखर निकम यांच्या विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे प्राबल्य किती आहे. त्याची चुणूकही या निवडणूकांमधून दिसून येणार आहे. म्हणूनच जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Gram Panchayat Elections