रत्नागिरी, ता. 04 : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडून पदवी मिळत होती. परंतु आता गोगटे स्वायत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच परीक्षा वेळेवर होऊन निकालही वेळेत जाहीर करण्याचे आव्हान पार केले आहे. याकरिता महाविद्यालयाच्या टीमने सुरेख काम केले आहे. पदवी, पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी आता आपले कौशल्य दाखवत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन र. ए. सोसायटीचे उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर यांनी केले. पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते. Graduation ceremony at Gogate Joglekar College


महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रम झाला. मंचावर संस्था कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, नियामक मंडळ सदस्य डॉ. चंद्रशेखर केळकर, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. साखळकर म्हणाले की, पदवी, पदव्युत्तर विभागात शिकून विद्यार्थी नव्या जगात प्रवेश करणार आहेत. आता त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्रासाठी करावी आणि आपल्या कॉलेज, शहराचे नाव उज्ज्वल करावे. नीतीमूल्य जपत आपण मेहनत करून शिखरावर पोहोचायचे आहे. कोणत्याही समस्येला आत्मविश्वास, जिद्दीने सामोरे जायला हवे. Graduation ceremony at Gogate Joglekar College
यापूर्वी विद्यापीठ पातळीवरील परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर होत नव्हते. मात्र येणारे सर्व अडथळे लक्षात घेऊन महाविद्यालय स्वायत्त झाल्यानंतर नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत परीक्षांचे वेळापत्रक, पेपर्स, निकाल वेळेवर लावण्यासाठी नियंत्रक डॉ. विवेक भिडे यांच्यासह आज्ञा शिरगावकर, प्रतीक शितूत यांनी खूप मेहनत घेतल्याचे डॉ. साखळकर यांनी आवर्जून सांगितले. Graduation ceremony at Gogate Joglekar College


या वेळी परीक्षा पद्धतीसंदर्भातील माहिती डॉ. भिडे यांनी दिली. महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर विभागातील १०९३ विद्यार्थ्यांपैकी ९७१ जणांना पदवी मिळणार असल्याचे सांगितले. या वेळी संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. प्रातिनिधीक विद्यार्थ्यांनी मनोगतांमध्ये महाविद्यालय व प्राध्यापकांचे विशेष आभार मानले. डॉ. मेघना म्हादये यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, सर्व शाखांचे उपप्राचार्य, विभागप्रमुख, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. Graduation ceremony at Gogate Joglekar College