गुहागर, ता. 11: कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळात महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचे स्वप्न अजय कापडे व सुमितकुमार भारस्कर या मल्लांनी साकार केले. त्यांनी अनुक्रमे फ्री स्टाईल व ग्रीको रोमन विभागात ही कामगिरी केली. Gold medal in wrestling
फ्री स्टाईल मधील ६५ किलो वजनी गटात अजय याने पहिल्याच कुस्तीत हरियाणाच्या विकास यादव याचा १६-६ असा धक्कादायक पराभव केला. विशेष म्हणजे ४-६ अशा पिछाडीवरून त्याने सातत्याने वेगवेगळे डावपेच टाकत सलग बारा गुण जिंकले आणि विजयश्री खेचून आणली. या लढतीच्या वेळी हरियाणाच्या पाठीराख्यांकडून पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत होता. तसेच विकासच्या प्रशिक्षकांनीही मिळवलेल्या गुणांबाबत दोन वेळा आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, सरपंचांनी प्रत्येक वेळी त्यांचे हे आक्षेप खोडून काढले. ही लढत जिंकल्यानंतर अजय याने नंतरच्या फेरीत हरियाणाच्या अतुल कुमार याला ७-२ ने पराभूत केले. उपांत्य फेरीत त्याने तेलंगणाच्या निखिल कुमार याचा ५-४ असा पराभव केला. अंतिम फेरीत अजयपुढे दिल्लीच्या आकाश कुमार याचे आव्हान होते. पहिल्या दोन मिनिटाच्या फेरीत त्याने ३-१ अशी आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्याच्यासाठी निर्णय ठरली. Gold medal in wrestling
सुवर्णपदक जिंकण्याची खात्री होती – अजय
“येथे सुवर्णपदक मिळवण्यासाठीच मी आलो होतो. पहिल्याच कुस्तीत विकास यादव याला पराभूत केल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि तेव्हापासूनच मी प्रत्येक लढतीत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध शेवटपर्यंत कसे नियंत्रण ठेवता येईल याचे नियोजन केले. त्यामुळे मी सोनेरी कामगिरी करू शकलो,” असे अजय कापडे याने सांगितले. कोल्हापूरचा हा पैलवान पुण्यातील सह्याद्री जिमखाना येथे विजय बराटे या वस्तादांकडे शिकत आहे. Gold medal in wrestling
ग्रीको रोमन विभागातील ७१ किलो गटात सुमित कुमार भारस्कर याने पंजाबच्या मनजोत सिंग याचा ११-७ असा पराभव केला. सुरुवातीला त्याच्याकडे ३-१ अशी आघाडी होती. नंतर मात्र दोन्ही खेळाडूंनी आक्रमक डावपेचांचा उपयोग केला. त्यामध्ये सुमित याने यश संपादन केले. बीडचा हा खेळाडू पुण्यात अमोल बुचडे यांच्याकडे सराव करीत आहे. सुमितकुमार याने उपांत्य फेरीत उत्तर प्रदेश बादल चौहान याला ६-४ असे पराभूत केले. पहिल्या टप्प्यात त्याने ३-१ अशी आघाडी घेतली होती. अंतिम लढतीनंतर सुमितकुमार म्हणाला,”सुवर्णपदक जिंकण्याबाबत आशावादी होतो, मात्र येथे आव्हान खूप तगडे होते. तरीही मी शेवटपर्यंत चिकाटी व संयम ठेवला त्यामुळेच मला यश मिळविता आले. या सुवर्णपदकाचे यश माझ्या सर्व प्रशिक्षकांना आणि पालकांना द्यावे लागेल”. Gold medal in wrestling