कोण जिंकणार याकडे जिल्ह्याचे लक्ष
गुहागर, ता. 21 : येथील निवडणूक अनेक निवडणुकांचा अनुभव गाठीशी असलेले उ.बा.ठा. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव विरुध्द विधानसभा प्रथमच लढणारे राजेश बेंडल यांच्यात होत आहे. निवडणुकीच्या प्रचारात आमदार जाधव यांची मुख्य मत उ.बा.ठा शिवसेनेवर होती तर राजेश बेंडल यांच्या प्रचारात महाविकास आघाडीबरोबरच कुणबी समाजोन्नती संघ, बळीराज सेना अशा संस्थाही उतरल्या होत्या. सुरवातील आमदार जाधव यांच्याबाजुला असलेले वातावरण अखेरच्या टप्प्यात राजेश बेंडल यांना बळकट करुन गेले. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित झाले आहे. अवघ्या 10 ते 15 हजारांच्या फरकाने दोघांपैकी एकाचा विजय होईल असा अंदाज आहे. Fight between Jadhav Bendal
गुहागर विधानसभेची जागा महाविकास आघाडीतर्फे आमदार जाधव किंवा आमदार पुत्र विक्रांत जाधव हेच लढणार हे निश्चित होते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीपासूनच आमदार जाधव यांनी विधानसभेची तयारी करायला सुरवात केली होती. याउलट महायुतीचा उमेदवार निवडणुका जाहीर झाल्यातरी ठरत नव्हता. भाजपकडून डॉ. नातू यांनी जोरदार तयारी केली. परंतु अखेरच्या क्षणाला महायुतीतून शिवसेना ही जागा लढविणार हे निश्चित झाले. या निश्चिती नंतरही शिवसेनेचा उमेदवार कोण हे ठरण्यात आठवडा गेला. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीतून प्रवेश केलेले राजेश बेंडल यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. Fight between Jadhav Bendal
त्यानंतर महायुतीच्या समन्वयाची बैठक चार दिवसांनी झाली. त्यामुळे महायुतीच्या प्रत्यक्ष प्रचाराची सुरवात 6 नोव्हेंबरनंतर झाली. शिवसेनेने विधान परिषदेचे आमदार रवींद्र पाठक आणि ठाण्यातील नगरसेवक राजेश मोरे या दोघांना निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठी पाठवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा प्रचार सुरु झाला. भाजपनेही मोठ्या भावाची जबाबदारी सांभाळत प्रचाराचे शिवधनुष्य उचलले. प्रदिप बेंडल यांनी कुणबी समाजोन्नती संघ आणि बळीराज सेनेच्या प्रचारातील समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली. तर राजेश बेंडल यांनी संपूर्ण मतदारसंघात फिरुन भेटीगाठी, छोट्या बैठका, सभा यातून थेट मतदारांशी संपर्क साधला. या नियोजनामुळे एकतर्फी निवडणुकीत राजेश बेंडल यांनी आमदार जाधव यांच्यासमोर आव्हान उभे केले. Fight between Jadhav Bendal
निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने राज्य व केंद्र सरकारने केलेले काम, लाडकी बहीण योजना, कुणबी समाजाचे एकगठ्ठा मतदान, सर्व समावेशक विकास, गुहागरमधील हॉस्पीटल या मुद्द्यांवर जोर दिला. मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेसाठी ताकद लावली. तर महाविकास आघाडीकडून आमदार जाधव यांनी गेल्या ५ वर्षात केलेल्या विकास कामांकडे पाहून मतदान करा, असे आवाहन केले. आमदार जाधव यांनी जिल्हा परिषद गटनिहाय प्रचारसभा आणि कार्यालयातून दररोज संपर्क यावर भर दिला होता. आक्रमक वक्ता म्हणून प्रसिध्द असलेल्या जाधव यांनी भाजप, डॉ. नातू आणि आपले जुने सहकारी असलेले राजेश बेडल, हुमणे गुरुजी, कृष्णा वणे यांच्यावर जोरदार टिका केली. मात्र एकनाथ शिंदेंवर टिका करण्याचे टाळले. Fight between Jadhav Bendal
त्याचबरोबर कळंबट गावातील विषय वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी उचलून धरला. त्यावेळी त्यांनी थेट आमदार जाधव यांच्यावर टिका केली होती. मतदानाच्या 4 दिवस आधी (17 नोव्हेंबर) त्यांच्यावर नरवणला प्राणघातक हल्ला झाला. त्यावेळीही त्यांनी आमदार जाधव यांच्याच नावाचा उल्लेख केला. हा मुद्दा महायुतीने प्रचारात आणला नाही. परंतु याचा परिणाम एका समाजावर चांगलाच झाला. हे सर्व मुद्दे निवडणुकीत परिणामकारक ठरतील. गुहागर विधानसभा मतदारसंघात 2019 विधानसभा (59.45) आणि 2024 लोकसभेपेक्षा (56.43) अधिक मतदान (61.79) झाले आहे. हे वाढीव मतदानही निवडणुकीचा निकाल ठरवणारेच ठरेल. त्यामुळे ही निवडणुक मतमोजणीच्या दिवशी चुरशीची झालेली दिसेल. Fight between Jadhav Bendal
मनसे मतदान सिमित राहील
मनसेने देखील वर्षभरापासून निवडणुकीची तयारी केली. तालुका संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांनी आधीपासूनच विधानसभेत प्रचार सुरु केला होता. यावेळी प्रचाराचे वेगवेगळे फंडेही मनसेने वापरले. मात्र शेवटच्या घटकेला प्रत्यक्ष मतपेटीत त्याचा परिणाम दिसून येण्यासाठी आवश्यक कार्यकर्त्यांचे बळ त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे प्रमोद गांधी सुमारे 10 हजार मतांपर्यंत मजल मारतील असा अंदाज आहे. अर्थात आधीच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या तुलनेत मनसेने आपली ताकद वाढवली हे निश्चित आहे. Fight between Jadhav Bendal