सांडपाण्याच्या प्रश्र्नाकडे गुहागर नगरपंचायतीचे दुर्लक्ष
गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायतीने सांडपाण्याचा प्रश्र्न सोडविलेला नाही. चर्चेसाठी प्रशासनाकडून वेळ दिली जात नाही. स्वच्छतेसारख्या गंभीर विषयात होणारी चालढकल पाहून गुहागर शहरातील शिवराम सहकारी गृहनिर्माण संस्थेने स्वातंत्र्यदिनी नगरपंचायतीसमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीला दिले. Fasting by Shivram Society on Independence Day
गुहागरमधील पहिला गृहनिर्माण प्रकल्प म्हणून शिवराम प्लाझाकडे पाहिले जाते. या गृहनिर्माण संस्थेने 48 सदनिकांमध्ये जवळपास 150 लोक रहातात. या गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकाधारकांना बाजुला असलेल्या पाणी झिरपण्याची क्षमता संपलेल्या (वॉटर टेबल लॅण्ड) जमिनीमुळे सांडपाण्याचा प्रश्र्न भेडसावू लागला आहे. सांडपाण्याच्या टाक्या भरल्या की त्यातील पाणी गृहनिर्माण संस्थेत तळमजल्यावर रहाणाऱ्या सदनिकाधारकांच्या संडास व बाथरुममध्ये साठून रहाते. ही समस्या सोडविण्यासाठी मे महिन्यात शिवराम गृहनिर्माण संस्थेच्या समितीने नगरपंचायतीची तोंडी परवानगी घेवून एक सांडपाणी वाहिनी गुहागर बसस्थानकाशेजारील गटारात सोडली होती. त्यासाठी सुमारे 40 हजार रुपये खर्च आला. मात्र हे काम झाल्यावर बसस्थानक परिसरातील काही व्यापारी व ग्रामस्थांनी नगरपंचायतीकडे गटारात सोडलेल्या सांडपाण्याच्या वाहिनीबाबत तक्रार केली. या तक्रारीवरुन कार्यवाही करताना नगरपंचायतीने शिवराम गृहनिर्माण संस्थेने टाकलेली सांडपाणीवाहिनी तोडून जप्त केली. जुन महिन्यात पाऊस सुरू झाल्यावर या संस्थेतील तळमजल्यावरील सदनिकाधारकांना सांडपाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. टाक्या भरल्याने सांडपाणी घरात येवू लागले आहे. त्यामुळे आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रश्र्न निर्माण झाला आहे. Fasting by Shivram Society on Independence Day
सांडपाण्याचा प्रश्र्न सोडविण्यासाठी शिवराम गृहनिर्माण प्रकल्पाच्या समितीने नगरपंचायतीकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र त्याची दखल नगरपंचायतीने घेतली नाही. चर्चेसाठी वेळ मागितला. त्याबाबतही उत्तर मिळत नाही. मुख्याधिकारी उपलब्ध नाहीत असे सांगण्यात आले. त्यामुळे अखेर स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा मार्ग शिवराम गृहनिर्माण मधील सदनिकाधारकांनी स्विकारला आहे. याबाबतचे पत्र आज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गुहागर नगरपंचायतीला दिले आहे. Fasting by Shivram Society on Independence Day
नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम २०४ (१) अन्वये आमच्या इमारतीतील मोऱ्यांचे पाणी नगरपरिषदेच्या मोरीत सोडण्याचा आम्हांला हक्क आहे. तरी नगरपंचायतीच्या मोरीत सोडण्यास लेखी परवानगी मिळावी, अशी आमची मागणी आहे. – शशिकांत दाते अध्यक्ष, शिवराम गृहनिर्माण संस्था. Fasting by Shivram Society on Independence Day