गुहागर ग्रामीण रुग्णालयातील अजब प्रकार; चौकशीची मागणी
गुहागर, ता. 24 : शासन जनतेला चांगली व मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी विविध योजना राबवत आहे. तर दुसरीकडे गुहागर आरोग्य विभागाचा अजब कारभार उघडकीस आला आहे. महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क नसताना सिजेरियन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांकडून प्रत्येकी 1500 रुपये आकारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकारची वरिष्ठांनी चौकशी करावी, अशी मागणी पीडित रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. Family Welfare Surgery

तालुक्यातील महिलांसाठी आरोग्य विभागाकडून गुहागर ग्रामीण रुग्णालय व तळवली उपकेंद्रामध्ये महिलांचे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी शासनाकडून निवृत्त वैद्यकीय अधिकारी श्री. गरुड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुहागर ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी तालुक्यातील पाच महिलांचे शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये सेजल संकेत गोयथळे व सुचित्रा सुशील मोहिते या महिलांचे प्रसूती सिझेरियन पद्धतीने झाली असल्याने प्रत्येकी 1500 रुपये येथील नर्सच्या माध्यमातून डॉ. गरुड यांनी घेतले. अशा प्रत्येक कॅम्पमध्ये पैसे घेतले जातात. असे येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. Family Welfare Surgery
शस्त्रक्रियेपूर्वीच या महिलांना तुमचे सिझेरियन ऑपरेशन झाले असल्याने 2000 ते 1500 रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले. हे पैसे कसले याबाबत विचारणा केली असता वेगवेगळी उत्तरे दिली जातात. सिझेरियन असल्याने येथील वैद्यकीय अधिकारी कोणतेही कारण सांगून येथे ऑपरेशन होणार नाही, अशी भित दाखवत असल्याने रुग्णांना अन्य पर्यायच उरत नाही. त्यामुळे अखेर रुग्णांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. Family Welfare Surgery
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत असली तरी गुहागर येथे शस्त्रक्रिया न झाल्यास रत्नागिरी येथे पाठवण्यात आल्यावर मानसिक त्रास व खर्च रुग्णांना परवडणारा नाही. तुलनेने यामध्ये रुग्णांचा फायदाच आहे. तालुक्याच्या ठिकाणी असे डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने येथे येऊन डॉ. गरुड ऑपरेशन करतात. अन्य कोणी येथे येण्यास तयार होत नाही असे सांगून अप्रत्यक्षपणे या कृत्याला समर्थन दिले. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी शासन प्रोत्साहन देत असते. एक किंवा दोन अपत्यानंतर शस्त्रक्रिया केल्यास शासनाकडून विशेष योजनेतून रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. असे असताना गुहागर आरोग्य विभागामार्फत रुग्णांचे आर्थिक लूट चालू असून याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे संकेत गोयथळे यांनी सांगितले. Family Welfare Surgery

