भारताच्या कुटनितीचा विजय, मोदी, जयशंकर व डोभाल यांची करामत
गुहागर, ता. 13 : तब्बल 17 महिने मृत्यूच्या छायेत जगणाऱ्या भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांची कतारमधुन 12 फेब्रुवारी 2024 ला सुटका झाली. कतार सारख्या हुकुमशाही राष्ट्रात भारताच्या कुटनितीचा विजय झाला. यासाठी सुटका झालेल्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तर निर्दोष मुक्तता केल्याबद्दल भारताने कतारचे अमीर शेख तमीन इब्न हमद अल थानी यांचे विशेष आभार मानले आहेत. Eight Indians freed from Qatar Jail
कतारमधील दाहरा ग्लोबल या कंपनीसाठी भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कमांडर विरेंद्रकुमार वर्मा, कमांडर सुग्नाकर पकाला, कमांडर अमित नागपाल, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर सेलर रागेश, कमांडर पूर्णेंदू तिवारी, निवृत्त कॅप्टन नवतेज सिंह गिल, निवृत्त कॅप्टन सौरभ वसिष्ठ काम करत होते. 30 ऑगस्ट 2022 रोजी या आठ जणांना कतारच्या सरकारने कोणतेही कारण न देता अटक केली होती. या अटकेनंतर तेथील माध्यमांमध्ये हे आठजण इस्रालयसाठी हेरगिरी करत होते अशी चर्चा सुरु झाली. भारतविरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींनी चर्चेतील आरोपांना खतपाणी घातले. तसेच यांना मृत्यूदंड व्हावा यासाठी एक दबावगट काम करु लागला. 26 ऑक्टोबर 2023 मध्ये कतारच्या न्यायालयाने या आठही नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली. पंतप्रधान नरेंद मोदी, केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सुरूवातीपासूनच या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. फाशीची शिक्षा झाल्यावर भारतातर्फे दोहा येथील न्यायालयात अपिल करण्यात आले. या सुनावणीमध्ये डिसेंबर 2023 मध्ये आठ जणांची फाशी न्यायालयाने रद्द केली आणि प्रत्येकाला स्वतंत्र जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर भारताकडून कुटनितीचा अवलंब केला गेला. त्यामध्ये भारताचा विजय झाला. Eight Indians freed from Qatar Jail
अवघ्या दोन महिन्यात सुत्रे हलली
डिसेंबर 2023 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणीय बदलांवर रचनात्मक अधिवेशनात सहभागी देशांची परिषद (COP 28) संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होती. त्यासाठी पंतप्रधान दुबईला गेले होते. त्यावेळी त्यांनी कतारचे अमिर शेख तमीन इब्न हमद अल थानी यांच्याबरोबर संवाद साधला. त्याच दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांची भेट घेतली. याच कालावधीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल कतारमधील अधिकाऱ्यांच्या भेटी घेत होते. या भेटींमधुन मैत्रीपूर्ण, सौम्य संवादाबरोबरच ताकदीचा अंदाज देणारा दबाव वेगवेगळ्या प्रभावशाली व्यक्तींवर निर्माण करण्यात आला. परिणामस्वरुप अवघ्या 2 महिन्यात कतारमधील न्यायालयाने भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली. या सुटकेनंतर भारतात परतलेल्या 7 नौदल अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. Eight Indians freed from Qatar Jail
कतारमध्ये काय घडले?
कतार सरकारने रडारचे संदेश भेदणारे सुरक्षा कवच असलेली पाणबुडी विकसीत करण्याचे ठरविले होते. ही अत्याधुनिक पाणबुडी बनविण्याचे काम दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी ॲण्ड कन्सल्टिंग सर्व्हिसेस या कंपनीतर्फे सुरु होते. या कंपनीमध्ये भारतीय नौदलातून निवृत्त झालेले 70 हून अधिक अधिकारी व कर्मचारी काम करत होते. एप्रिल 2022 दरम्यान कतारने हा प्रकल्प थांबविण्याचा निर्णय घेतला. कंपनीमधील सर्वांना मे 2022 च्या अखेरीस देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आला. भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कमांडर विरेंद्रकुमार वर्मा, कमांडर सुग्नाकर पकाला, कमांडर अमित नागपाल, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर सेलर रागेश, कमांडर पूर्णेंदू तिवारी, निवृत्त कॅप्टन नवतेज सिंह गिल, निवृत्त कॅप्टन सौरभ वसिष्ठ कंपनीच्या अन्य व्यवस्था पूर्ण करण्यासाठी तिथे थांबले होते. या काळात या 8 अधिकाऱ्यांनी पाणबुडी संदर्भातील गुप्त माहिती इस्रायला पुरवल्याचे आरोप माध्यमांमधुन झाले. त्यामुळे कतार सरकारने 30 ऑगस्ट 2022 रोजी कोणतेही कारण न सांगता या आठही अधिकाऱ्यांना अटक केली होती. या अटकेनंतर संबंधितांच्या नातेवाईकांनी भारत सरकारने यात लक्ष घालावे अशी मागणी केली. तेव्हापासून केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर या कुटुंबियांच्या संपर्कात होते. Eight Indians freed from Qatar Jail