जिल्ह्यातील लघुउद्योग क्षेत्रासाठी ऐतिहासीक क्षण
गुहागर, ता. 24 : येथील प्रसिद्ध खातू मसाले उद्योगाचे संस्थापक श्री. शाळीग्राम खातू यांना भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने मान्यता दिलेली राष्ट्रीय स्तरावरील ऑनरेरी डॉक्टरेट अवॉर्ड कौन्सिल या संस्थेतर्फे डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. याच समारंभात जागतिक मानवी हक्क आयोगाचे सक्रीय सभासदत्व देण्यात आले. यापूर्वी मंडणगडमधील विकास शेटे यांना हा सन्मान मिळाला होता. मात्र गुहागर तालुक्यातील उद्योजकाला डॉक्टरेट मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. Doctoral degree to Shaligram Khatu


ऑनरेरी डॉक्टरेट अवॉर्ड कौन्सिल (HDAC)
ऑनरेरी डॉक्टरेट अवॉर्ड कौन्सिल (HDAC) ही भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने मान्यता दिलेली राष्ट्रीय स्तरावरील ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. 14 मे 2021 रोजी स्थापन झालेली ही संस्था समाजातील शैक्षणिक क्षेत्र, व्यवसाय, कला आणि सामाजिक सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याचे काम करते.


खातू मसाले उद्योग
गुहागर तालुक्यातील शाळीग्राम खातू यांनी सन 1978 मध्ये खातू मसाले हा ब्रँड बाजारात आणला. अतिशय मेहनत घेऊन त्यांनी आपला मसाला उद्योग भरभराटीस नेला आहे. आज कोकणात चार हजार पेक्षा जास्त विक्रेत्यांकडे खातू मसाले उत्पादने मिळतात. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, या शहरातून तसेच परदेशातूनही खातू मसालेच्या उत्पादनांना मागणी आहे. ॲमेझॉनसारख्या इ कॉमर्स कंपन्यांद्वारे तसेच डी मार्टच्या व्यावसायिक मॉलमध्येही खातू मसाले उत्पादनांची विक्री केली जाते. अशाप्रकारे जागतिक स्तरावर उत्पादने पोचविणारा खातू मसाले हा गुहागर तालुक्यातील एकमेव उद्योग आहे. Doctoral degree to Shaligram Khatu


या उद्योगाने आपल्या सर्व उत्पादनांची गुणवत्ता आणि चव अनेक वर्ष कायम ठेवली आहे. तसेच महिलांच्या स्वयंपाकघरातील गरजा लक्षात घेवून आपल्या उत्पादनांमध्ये वाढही केली आहे. एकेकाळी केवळ मसाले उत्पादने असणाऱ्या या उद्योगाने गेल्या 10 वर्षात वेगवेगळी पिठांनाही बाजारपेठेत स्थिर केले. आज खातू मसालेची 40 हून अधिक उत्पादने बाजारपेठत आहेत. उद्योजक म्हणून यशस्वी होताना खातू परिवाराने सामाजिक दायित्वही जपले आहे. दरवर्षी सैनिकांसाठी, कॅन्सरवरील संशोधनासाठी ते आपल्या नफ्यातील काही टक्के रक्कम देणगीदाखल देत असतात. उत्पादनांची सातत्यपूर्ण गुणवत्ता, उद्योगाचे उत्कृष्ट नियोजन, नाविन्यतेसाठी सतत सुरू असलेले संशोधन, आर्थिक शिस्त या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन ऑनरेरी डॉक्टरेट अवॉर्ड कौन्सिलने उद्योग क्षेत्रातील डॉक्टरेट ही मानद पदवी देवून शाळीग्राम शांताराम खातू यांचा सन्मान केला आहे. 22 मार्चला दिल्लीत झालेल्या समारंभात त्यांना हा सन्मान देवून गौरविण्यात आले. सन्माननीय व्यक्तींना समाजासाठी अधिक कार्य करता येण्यासाठी ऑनरेरी डॉक्टरेट अवॉर्ड कौन्सिलतर्फे कायदेशीर प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला जातो. त्याप्रमाणे या समारंभात युएसए व न्यु यॉर्क राज्य मान्यताप्राप्त जागतिक मानवी हक्क आयोग या संस्थेचे सक्रीय सभासदत्व देण्यात आले. Doctoral degree to Shaligram Khatu