पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारे मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज
गुहागर, ता. 26 : दरवर्षी कोकणात उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवते. पाणी टंचाईच्या या संकटावर मात करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळा संपल्यावर मिशन बंधारे मोहीम हाती घेतली जाते. मात्र सध्यस्थीतीत काही ठिकाणी बंधारे ओस पडल्याचे चित्र आहे. Dams fell dew
कोकणात विशेषतः मार्च महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचे संकट उभे राहते. यावर मात करण्यासाठी अनेक गावांमध्ये शासनाकडून मिशन बंधारे मोहीम राबविण्यात आली. यासाठी शासनाकडून सुरुवातीला बंधारा बांधण्यासाठी साहित्य तसेच मजुरी देखील दिली गेली. त्यामुळे या मोहिमेला नागरिकांचा देखील उस्फुर्त प्रतिसाद लाभला. मात्र कालांतराने ही बंधारे मोहीम काहीशी मंदावल्याचे दिसून आले. कारण यासाठी शासनाकडून बंधारे साहित्य तसेच मजुरी मिळणे बंद झाल्याने या मोहिमेला अनेक ठिकाणी तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामपंचायत स्तरावर देखील आजही बंधारे बांधण्याचे आवाहन केले जाते. मात्र, मोबदला आणि साहित्य उपलब्ध केले जात नसल्याने सध्या बंधारा बांधण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. Dams fell dew
यावर्षी पाऊस उशीरापर्यंत पडल्याने पाणीसाठे उशिरापर्यंत आटणार नाहीत, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र पावसाने पाठ फिरवल्यानंतर अनेक ठिकाणी पाणीसाठे आटल्याचे चित्र आहे. साहजिकच यामुळे बंधारे देखील अनेक ठिकाणी ओस पडले आहेत. अनेक ठिकाणी आजही श्रमदानातून बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी हे बंधारे नदी-नाल्याना पाणीसाठा नसल्याने बंधारे देखील पूर्णपणे कोरडे पडले आहेत. यासाठी शासनाने बंधारे मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे साहित्य पुरवठा व मोबदला दिल्यास ही मोहीम पुन्हा अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. Dams fell dew