दाभोळ खाडीतील मच्छीमारांची समस्या, उपरच्या वाऱ्याची प्रतिक्षा
मयूरेश पाटणकर
गुहागर, ता. 26 : निर्बंधांचा काळ संपून समुद्रातील मच्छीमारी सुरु झाली असली तरी दाभोळ खाडीतील सुमारे 100 यांत्रिकी नौकांना उत्तरेच्या वाऱ्यांची प्रतिक्षा आहे. दक्षिणेकडून वाहाणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्र शांत होत नाही. परिणामी दाभोळ खाडीतून समुद्रात जाण्याचा मार्ग खुला होत नाही. त्यामुळे सुमारे 600 मच्छीमार समुद्राचे प्रवेशद्वार उघडण्याची वाट पहात आहेत. Dabhol Bay Fishermen’s Problem


महाराष्ट्रात 1 जून ते 31 जुलै हे दोन महिने मच्छीमारीवर बंदी असते. त्यानंतर सर्व मत्स्यव्यावसायिक आपल्या होड्या, यांत्रिकी बोटी समुद्रात नेतात. मच्छीमारीचा हा हंगात थोडा पाऊस आणि वारा यांच्यावर अवलंबुन असतो. सलग मच्छीमारी करता येत नाही. परंतु याच हंगामात अंडी घालून समुद्रात जाणाऱ्या तसेच किनाऱ्यालगत थांबणाऱ्या माशांची संख्या अधिक असते. त्यामुळे कमी दिवसात जास्त कमाई देणारी मच्छीमारी यावेळी होते. मात्र दाभोळ खाडीतील नौकांना या काळात समुद्रातील प्रवेश बंद रहातो. Dabhol Bay Fishermen’s Problem


दाभोळ खाडीतील दापोली तालुक्यातील ओणी, भाटी, नवसे आणि दाभोळ या गावात 6 सिलेंडर असलेल्या 35 ते 40 नौका आहेत. तर गुहागर तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर, नवानगर, धोपावे आणि तरीबंदर या गावातून सुमारे 60 ते 65 यांत्रिकी नौका आहेत. त्यामध्ये 10 ते 12 नौका 6 सिलेंडरच्या आहेत. एका मच्छीमार नौकेवर किमान 6 खलाशी असतात. नैसर्गिक प्रवेशबंदीमुळे सुमारे 100 यांत्रिकी नौकांवरील 600 खलाशांना रोजगारासाठी ताटकळत थांबावे लागते. Dabhol Bay Fishermen’s Problem


दाभोळ खाडीच्या मुखाशी वाळुचा डोंगर (सॅण्डबार) मच्छीमारी भाषेत दांडा असल्याने खाडीतील नौकाना गोपाळगडाच्या पायथ्यापासून ते अंजनवेल दिपगृहापर्यंत चिंचोळ्या मार्गाने यावे लागते. पावसाळ्यात समुद्रातील वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात. त्याला मच्छीमार हेटचा वारा म्हणतात. हा हेटचा वारा सुरू असताना समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे दाभोळ खाडीतून समुद्रात जाणाऱ्या चिंचोळ्या मार्गादरम्यान दांड्यावर आदळून येणाऱ्या उत्तर ते दक्षिण लाटा, समुद्रातून पश्चिमकडून ते पूर्वकडे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांचे प्रमाण अधिक असते. येथील उलट सुलट लाटांमध्ये नौका चालवणे धोक्याचे असते.


नारळी पौर्णिमेनंतर समुद्र शांत होऊ लागला की किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटांचा जोर मंदावतो. समुद्र शांत होतो. हेटचे वारे थांबतात आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे मंद गतीने वारे (उपरचे वारे) वाहु लागतात. यावेळी वातावरण पाहून काही मच्छीमार आपल्या नौका समुद्रात नेतात. भाद्रपदी गणेशोत्सवानंतर ही परिस्थिती अधिक अनुकूल होते. त्यामुळे बहुतांशी मच्छीमार गणेशोत्सवानंतर समुद्रात जातात. Dabhol Bay Fishermen’s Problem
समुद्रातील प्रवेश बंदीमुळे आमचा रोजगार बुडतो. गणेशोत्सवानंतरच्या हंगामात तुलनेत मच्छीसाठी अधिक प्रतिक्षा करावी लागते. याहीपेक्षा दाभोळ खाडी सुरक्षित असली तरी वादळी परिस्थितीत समुद्रातून खाडीत येण्याचा मार्गही बंद होतो. अशावेळी जयगड खाडीत जाण्यासाठी 2 ते 4 तासांचा धोकादायक प्रवास करावा लागतो. Dabhol Bay Fishermen’s Problem – अनिल खडपेकर, मच्छीमार