अटकेची भीती दाखवून ६८ वर्षीय वृद्धाला लुटले
गुहागर, ता. 10 : सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे सायबर भामट्यांचे प्रकार सुरूच आहेत. गुहागर शहरातील कीर्तनवाडी कालवा रोड परिसरात राहणाऱ्या ६८ वर्षीय वृद्धाची अशाच प्रकारे १५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बनावट चौकशी, अटकेची भीती आणि पैशांच्या व्यवहारांचे आमिष दाखवून आरोपींनी वृद्धाला मानसिक दबावाखाली आणत त्यांच्याकडून रक्कम उकळली. Cyber fraud in Guhagar
विजय सहदेव गडदे (६८, निवृत्त माझगाव डॉक, सध्या रा. मुलुंड) असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी संदीप दिवान आणि सदाकत खान यांच्याविरोधात ७ नोव्हेंबर रोजी गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Cyber fraud in Guhagar
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या विजय गडदे यांना २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप कॉल आला. फोन करणाऱ्या सदाकत खान याने आपण बंगळूर येथील सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. गडदे यांच्या नावाने कॅनरा बँकेच्या मुलुंड शाखेत खाते उघडण्यात आले असून, त्यातून तीन कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा धक्कादायक दावा त्याने केला. या व्यवहारातील दहा टक्के म्हणजेच ३० लाख रुपये गडदे यांना मिळाल्याचेही सांगण्यात आले. यानंतर आरोपींनी संदीप दिवान याच्या माध्यमातून गडदे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याची कथित प्रत पाठवली. काही वेळाने ती प्रत हटवण्यात आली. चौकशीच्या नावाखाली पैशांची मागणी करत, रक्कम जमा न केल्यास अटक होईल, अशी भीती दाखवण्यात आली. या प्रकारामुळे गडदे मानसिक दबावाखाली आले. Cyber fraud in Guhagar
दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी मुलुंड येथे असतानाही आरोपींकडून त्यांना वारंवार फोन करण्यात आले. चौकशीसाठी २५ लाख रुपये जमा करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता पुन्हा व्हॉट्सअॅप कॉल करून बँक खात्याचा तपशील देण्यात आला. आरोपींच्या सांगण्यावरून गडदे यांनी एसबीआयच्या धनादेशाद्वारे मुलुंड येथील एसबीआय शाखेत १५ लाख रुपये जमा केले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विजय गडदे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. Cyber fraud in Guhagar
या आधी चिपळूण तालुक्यातील बामणोली येथील एका ज्येष्ठ नागरिकाची २४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ताजी असतानाच गुहागरमध्ये पुन्हा एका वृद्धाला १५ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे. Cyber fraud in Guhagar
