सायंकाळी किनाऱ्यावर जाण्यास मज्जाव, पर्यटकांनी व्यक्त केली नाराजी
गुहागर, ता. 06 : दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेल्या गुहागरात मोठी गर्दी केली आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्व प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरली आहेत. मात्र, गुहागर चौपाटीवर किनाऱ्यावरील पोलीस कर्मचारी आणि बंदर विभागाच्या सुरक्षा रक्षकांकडून पर्यटकांना समुद्रात आंघोळ करण्यास व सायंकाळी सात वाजल्यानंतर बसू दिले जात नसल्याने पर्यटकांसह स्थानिक स्टॉलधारक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. असे प्रकार यापुढेही सुरु राहिल्यास पर्यटक गुहागरकडे पाठ फिरवतील. अशी भीती व्यक्त केली. Crowd of tourists in Guhagar
गुहागरमध्ये पर्यटन हंगाम सुरु झाला असून या हंगामाची सुरुवात दिवाळीतील सलग पडलेल्या सुट्ट्यामुळे झाली आहे. निसर्ग सौंदर्याबरोबरच लांबलचक स्वच्छ, सुंदर समुद्र चौपाटी लाभलेल्या गुहागरची ओळख राष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे. प्राचीन मंदिरासह प्रेक्षणिय पर्यटन स्थळांमुळे पर्यटक दरवर्षी मोठया संख्येने येत असतात. गुहागरमधील अनेक देवस्थाने ही मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी राहणाऱ्यांची कुलदैवत असल्याने कामानिमित्त स्थलांतरित झालेली मंडळी गुहागरात येत असतात. तर दुसरीकडे इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडलेले पर्यटक हे वर्षानुवर्षे पर्यटनासाठी गुहागरची निवड करत असतात. गुहागर हे सुरक्षित ठिकाण असल्याने सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या याठिकाणी लक्षणीय असते. Crowd of tourists in Guhagar
दिवाळी सुट्टीमुळे गुहागर चौपाटी, समुद्रातील बोटीग, घोडेस्वार, खाद्य पदार्थांचे स्टॉलवर पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसते. परचुरी खाडीमध्ये सत्यवान दर्देकर यांनी कोकणातील पहिलीच हाऊसबोट सुरू केली असून या सेवेला पर्यटक पसंती देत आहेत. शिवाय मगर सफर देखील सर्वाना आकर्षणाचे झाले आहे. दाभोळ – धोपावे फेरीबोट, तवसाळ – जयगड फेरीबोटीबरोबरच डॉ. चंद्रकांत मोकल व डॉ. योगेश मोकल यांनी याच परचूरी खाडीमध्ये काही दिवसांपूर्वीच फेरीबोट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आलेला पर्यटक केवळ गुहागर शहरामध्येच न राहता तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विखुरला गेला आहे. Crowd of tourists in Guhagar
गेल्या काहीवर्षात उच्च दर्जाच्या पर्यटकंसाठी इथल्या व्यवसायिकांनी अत्याधुनिक दर्जाची हॉटेल व राहण्याच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. चित्रपट व टीव्ही मालिकामुळे गुहागरचे सुंदर रूप सर्वदूर पोहोचल्याने पर्यटकांचा ओढा गुहागरच्या दिशेने येताना दिसत आहे. गुहागर शहरात चांगल्या दर्जाचा पर्यटक समुद्र चौपाटी, सुरुबनाचा आणि लांबलचक समुद्राचा आनंद लुटत असतो. किनाऱ्यावर सुरु बनात आणि वाळूत खेळत असतो. समुद्रात सुरक्षितपणे आंघोळ करता यावी म्हणून नगरपंचायतीकडून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बंदर विभागाकडून ठेवण्यात असलेले सुरक्षा रक्षक व पोलीस कर्मचारी समुद्रात आंघोळ करणाऱ्या पर्यटकांना आणि किनाऱ्यावर बसलेल्या पर्यटकांना सायंकाळी बाहेर काढतात. इतक्या लांबून येऊन चौपाटीवर आनंद लुटता येत नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे काही पर्यटक तालुक्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यावर जाणे पसंत करत आहेत. यासंदर्भात इथल्या व्यसवसायिकानी गुहागर पोलीस स्थानकात जाऊन असे प्रकार थांबवावेत, अशी विनंती करूनही काही उपयोग झालेला नाही. Crowd of tourists in Guhagar