ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, सभापती प्रणव पोळेकर तात्काळ घटनास्थळी
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील वेळंब घाडेवाडी येथील मराठी शाळा क्रमांक २ मध्ये विद्यार्थ्यांसाठी पोषण आहाराचे जेवण बनवताना कुकरचा स्फोट झाल्याची घटना घडली. शाळेच्या शेजारी असलेल्या किचन शेडमध्ये हा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत विद्यार्थी सुरक्षित असून, स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. Cooker explosion at school
पोषण आहार बनवण्याचे काम सुरू असताना अचानक कुकरचा स्फोट झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ मंगेश बारगोडे, विकास बारगोडे आणि रामचंद्र मापारले यांनी धाडस दाखवत परिस्थिती हाताळली. आगीचा धोका लक्षात घेऊन त्यांनी सिलेंडरचा पाईप सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा धोका टळण्यास मदत झाली. घटनेची माहिती मिळताच गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, अमरदीप परचुरे, रायचंद गळवे, गटशिक्षण अधिकारी गुहागर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून विद्यार्थी तसेच पोषण आहार बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. संकटाच्या वेळी धाडसाने पुढाकार घेणाऱ्या ग्रामस्थांचे त्यांनी कौतुक केले. Cooker explosion at school
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या स्वयंपाकघरात अशी घटना घडल्याने शालेय सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा कुकर, गॅस सिलेंडर, पाईप आणि इतर उपकरणांची नियमित तपासणी केली जाते का, तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना आहेत का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित बाब असल्याने संबंधित यंत्रणेने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. Cooker explosion at school
