गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत शासनाने स्थानिक सनियंत्रण समिती स्थापन केली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या स्थानिक सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी स्थानिक आमदार भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या शिफारशीने समितीवरील अन्य सदस्यांच्या नावांना शासनाने मान्यता दिली आहे. Construction Workers Monitoring Committee
इमारत व इतर बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि त्यांना शासकीय लाभांचे प्रभावी वाटप व्हावे, यासाठी शासनाने ही समिती गठीत केली आहे. समितीचे अध्यक्ष, आमदार भास्कर जाधव यांनी या समिती सदस्य पदासाठी उमेश प्रभाकर महाडिक (घाणेखुंट, ता. खेड), नदीम युसुफ काकडे (अंजनवेल, ता. गुहागर), मंगेश कृष्णा माटे (कामथे, ता. चिपळूण), सौ. साक्षी शेखर चव्हाण (मढाळ, ता. गुहागर) आणि सौ. वर्षा राजेंद्र चव्हाण (रामपूर, ता. चिपळूण) यांच्या नावांची शिफारस शासनाकडे केली होती. त्यानुसार या सर्व नावांना शासनाने मान्यता देऊन त्याची निवड जाहीर केली आहे. समितीचे अध्यक्ष, आमदार भास्कर जाधव यांनी निवड झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले असून इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या समस्यांचे निवारण व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. Construction Workers Monitoring Committee
